यंदा होणार्‍या चारधाम यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक भाविकांसाठी नाव नोंदणी अनिवार्य !

नवी देहली – हिंदु धर्मात चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यांच्या दर्शनासाठी हिंदू कित्येक मासांपासून वाट पहात असतात. ही सर्व तीर्थक्षेत्रे उत्तराखंड राज्यात असून यंदा राज्यशासनाने या यात्रेसाठी काही नियम बनवले आहेत. दर्शनाला जाण्यासाठी अगोदरच भाविकांना नाव नोंदणी करावी लागणार आहे. त्याखेरीज या धार्मिक यात्रेत सहभागी होता येणार नाही.

१. प्रतिवर्षी चारधाम यात्रा एप्रिल ते मे मासात चालू होते आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत चालू रहाते.

२. चारधाम यात्रेसाठी भाविकांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. सध्याच्या स्थितीत बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांसाठी नोंदणी चालू आहे, तर गंगोत्री अन् यमुनोत्री या धामांसाठी नोंदणी अजून चालू झालेली नाही. दोन्ही मंदिरांचे दरवाजे उघडण्याची घोषणा झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया चालू होईल.

३. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या अध्यक्षतेखालील समिती चारधाम यात्रेच्या सिद्धतेचा आढावा घेणार आहे. गेल्या वर्षी चारधाम यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने गेल्या वर्षीच्या आधारावर यंदा केदारनाथ धामसाठी प्रति दिवशी १५ सहस्र, बदरीनाथ धामसाठी प्रति दिवशी १८ सहस्र, गंगोत्री धामसाठी ९ सहस्र, तर यमुनोत्रीसाठी ६ सहस्र भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

४. चारधाम यात्रेच्या मार्गावर भाविकांना आरोग्य सुविधा, रहाण्याची व्यवस्था, बसची सुविधा, घोडे आणि खेचर यांची आरोग्य तपासणी, वीज आणि पिण्याचे पाणी आदी व्यवस्था देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.