आयफोनसाठी तरुणाने ऑनलाईन मागवलेले साहित्य पोचवणार्‍या तरुणाची केली हत्या !

हासन (कर्नाटक) – येथील अरसीकेरे शहरात एका २० वर्षीय तरुणाने ४६ सहस्र रुपयांच्या आयफोनसाठी ऑनलाईन मागवलेल्या साहित्याचे वितरण करणार्‍या २३ वर्षीय तरुणाची हत्या केली.

१. हत्या करणारा तरुण हेमंत दत्ता याने ४६ सहस्र रुपयांचा आयफोन ऑनलाईन मागवला होता. ‘ई-कार्ट’ या वितरण आस्थापनात काम करणारा हेमंत नायक हा तरुण आयफोन घेऊन हेमंत दत्ताच्या घरी पोचला. या वेळी दत्ता याच्याकडे आयफोनचे ४६ सहस्र रुपये रोख देण्यासाठी नव्हते. त्यामुळे त्याने नायक याला घराच्या आत बोलावले. नंतर दत्ता याने नायक याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. नायक याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे त्याला न सुचल्याने ३ दिवस मृतदेह घरातच होता. नंतर त्याने रात्री दुचाकीवरून मृतदेह अंचेकोप्पलू रेल्वे स्थानकाजवळ नेऊन जाळला. नंतर पोलिसांना हा जळालेला मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या मृतदेहाच्या प्रकरणाची अन्वेषण केल्यावर वरील घटना उघड झाली.

२. पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह मिळाल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पडताळायला चालू केल्यावर आरोपी स्कुटीवर मृतदेह घेऊन जातांना दिसत होता. त्यावरून पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली.

३. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी हेमंत दत्ताने सांगितले की, त्याच्याकडे वितरण करणार्‍या तरुणाला द्यायला ४६ सहस्र रुपये नव्हते आणि त्याला आयफोन हवाच होता. त्यासाठी त्याने हेमंचा खून करण्याचा निर्णय घेतला.

संपादकीय भूमिका 

तरुण पिढीवर योग्य संस्कार होत नसल्याचाच हा परिणाम आहे ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, पालक आणि समाज उत्तरदायी आहेत !