समस्त हिंदूंनी जातपात विसरून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे ! – योगऋषी रामदेवबाबा

  • तपोभूमी, कुंडई येथे सनातन धर्म संघ सभा

  • पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांची वंदनीय उपस्थिती

तपोभूमी, कुंडई येथे सनातन धर्म संघ सभा

तपोभूमी, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत. समस्त हिंदूंनी जातपात विसरून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी तपोभूमी येथे सनातन धर्म संघ सभेत उपस्थित हिंदूंना उद्देशून केले.

योगऋषी रामदेवबाबा संबोधित करतांना

श्रीक्षेत्र, तपोभूमी, कुंडई येथे १९ फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीच्या पवित्र दिनी झालेल्या सनातन धर्म संघ सभेत योगऋषी रामदेवबाबा बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पद्मश्री पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज, ‘पतंजलि योग समिती’चे आचार्य बालकृष्णजी, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, ‘पतंजली योग समिती’च्या ‘भारतीय शिक्षा बोर्ड’चे सिंग, दैनिक ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक श्री. किरण ठाकूर, श्रीदत्त पद्मनाभ पिठाच्या संचालिका गुरुमाता अधिवक्त्या ब्राह्मीदेवी यांची उपस्थिती होती.

केवळ हिंदु म्हणून एकत्र येऊन धर्मरक्षणाचे कार्य करा ! – पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज

सभेच्या प्रारंभी पद्मश्री पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज महाराज यांचे मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, ‘‘श्रीक्षेत्र, तपोभूमी येथून मागील ३० वर्षे हिंदु धर्मरक्षणाचे कार्य अव्याहतपणे चालू आहे. आज प्रत्येक हिंदूने जातपात, पंथ आणि संप्रदाय अशा बिरुदावली बाजूला ठेवून केवळ हिंदु म्हणून एकत्र येऊन धर्मरक्षणाचे कार्य केले पाहिजे.’’

गोवा ही भोगभूमी नव्हे, तर तपोभूमी ! – आचार्य बालकृष्ण

आचार्य बालकृष्ण म्हणाले, ‘‘गोव्याची ओळख ही भोगभूमी म्हणून करण्यात येते; मात्र गोवा ही भोगभूमी नव्हे, तर तपोभूमी आहे. हिमालयामध्ये जी औषधी वनस्पतींची लागवड केली जाते, तशा प्रकारची लागवड गोव्यातही करता येऊ शकते.’’

संकल्प करतांना व्यासपिठावर डावीकडून तरुण भारतचे किरण ठाकुर, आचार्य बालकृष्णजी, योगऋषी रामदेवबाबा, पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुदिन ढवळीकर आणि श्रीपाद नाईक

सभेच्या अखेर योगऋषी रामदेवबाबा यांनी उपस्थित सर्वांना देशातील ऋषी परंपरा आदींचे रक्षण करून अखंड भारताच्या रक्षणासाठी कार्य करण्याची शपथ दिली. सोहळ्याला गोव्यातील विविध मंदिर समित्या, हिंदुत्वनिष्ठ संघटना आदींच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

गोवा योगभूमी बनवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यात पैसे आदी आमिषांना बळी पडून कुठेही धर्मांतर होऊ न देणे आणि गोव्याची ओळख ‘योगभूमी’ म्हणून करणे यांसाठी गोमंतकियांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ४५० वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीत पूर्वजांनी धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

त्या काळी कठीण परिस्थितीतही पूर्वजांनी धर्माचे रक्षण केले आहे. स्वधर्माच्या रक्षणाचे दायित्व प्रत्येक मंदिर समिती, संघटना आदी सर्वांचेच आहे. प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याचा प्रकार कुणीही खपवून घेऊ नये. गोव्यातील ओळख ‘सन’, ‘सँड’ अँड ‘सी’ अशी केली जात होती. यामध्ये आता पालट करून या ३ ‘सी’च्या जोडीला ‘स्पिरिच्युअल’ म्हणजे आध्यात्मिक पर्यटनाला जोडले जाणार आहे. गोवा हे ‘वेलनेस’ (आरोग्यदायी) केंद्र व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करत आहे.’’