जात्‍यंधांवर कारवाई हवीच !

‘श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्‍येष्‍ठ निरुपणकार पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करतांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

‘श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्‍येष्‍ठ निरुपणकार पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना राज्‍यशासनाचा यंदाचा ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित झाला आहे. या पुरस्‍काराला जात्‍यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्‍पासाहेब यांनी व्‍यसनमुक्‍तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे. त्‍याचसमवेत वृक्ष लागवड, स्‍वच्‍छता मोहिमा, रक्‍तदान शिबिरे, तलाव आणि नदी स्‍वच्‍छता इत्‍यादी अनेक उपक्रम यशस्‍वीरित्‍या राबवले आहेत. हे सर्व सामाजिक कार्य असले, तरी त्‍यांचे मुख्‍य कार्य हे आध्‍यात्मिक म्‍हणजे निरुपणाचे आहे. ते समर्थ रामदासस्‍वामी रचित ‘दासबोध’ या ग्रंथातील श्‍लोकांचे अर्थ सोप्‍या शब्‍दांत संप्रदायाच्‍या बैठकांमधून सांगतात. या बैठकांमुळे अनेक जण सन्‍मार्गाला लागले आहेत, अनेकांची व्‍यसने सुटली आहेत, त्‍यांच्‍या जीवनात मोठे पालट झाले आहेत. श्रवण-कीर्तन हा हिंदु धर्मातील उपासनेचा एक मार्गच आहे. या मार्गाद्वारे दासबोधाच्‍या आधारे जीवनाचा बोध देऊन जनसामान्‍यांच्‍या जीवनात कुणी प्रकाश टाकत असेल, तर ते निश्‍चितच अभिनंदनीय आणि कृतज्ञतेस पात्र कार्य आहे. या कार्याचा गौरवच महाराष्‍ट्र शासनाने पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्‍कार देऊन केला आहे. श्री समर्थ संप्रदायात काही थोड्या थोडक्‍या नाही, तर लाखो अनुयायांचा समावेश आहे. वर्ष २००८ मध्‍ये पू. अप्‍पासाहेब यांचे वडील पू. नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार मिळाला होता. या सोहळ्‍याला ४० लाखांहून अधिक अनुयायी जमले होते. त्‍यावरून धर्माधिकारी कुटुंबियांचे या क्षेत्रात किती मोठे योगदान आहे, याची कल्‍पना येते.

संप्रदायांचे योगदान

समाजात धर्म-अध्‍यात्‍म यांच्‍याविषयी विशेष रूची नाही. त्‍यामुळे एखाद्या संघटनेचे, संप्रदायाचे सामाजिक क्षेत्रात काय योगदान आहे ? याचा विचार केला जातो. त्‍याकडे लक्ष जाते; कारण आध्‍यात्मिक क्षेत्रातील कार्य मोजण्‍याची, कार्याचे मूल्‍यमापन करण्‍याची यंत्रणा अथवा ती दृष्‍टी समाज अथवा शासनकर्ते यांच्‍याकडे नाही. हिंदु धर्मातील विविध संप्रदाय हे वेगवेगळ्‍या मार्गाने ईश्‍वराची उपासना सांगत असले, तरी त्‍या धर्मातील संस्‍कृती, सभ्‍यता यांचेच या मार्गाने एकप्रकारे रक्षण करत असतात. आजच्‍या निधर्मी व्‍यवस्‍थेत जो काही हिंदु धर्म टिकवून ठेवला आहे, तो असे संप्रदाय आणि संघटना यांनीच ! संप्रदाय आणि त्‍यांचे अध्‍वर्यू यांच्‍याविषयी हिंदु समाजाने कायमच ऋणी राहिले पाहिजे. हिंदु समाजासाठी अथक आणि निरपेक्ष कार्य करून संप्रदायाचे अध्‍वर्यू पुरस्‍काराच्‍या पलीकडे गेलेले असतात. पू. अप्‍पासाहेब यांनाही ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार दिलेला असला, तरी त्‍यांच्‍या कार्यामुळे जगभरातील अनुयायांमध्‍ये परिवर्तन होत असल्‍याने ते वंदनीय ठरतात.

जात्‍यंधपणाची परिसीमा

या पार्श्‍वभूमीवर पुरस्‍काराला विरोध करणार्‍या जात्‍यंध संघटनेची ‘महाराष्‍ट्र भूषण पुरस्‍कार मिळालेल्‍यांनी समाजासाठी कोणते योगदान दिले ?’, असा प्रश्‍न विचारण्‍याची पात्रता तरी आहे का ? ज्‍यांनी लाखोंच्‍या जीवनाला दिशा दिली, त्‍यांना पुरस्‍कार नाही देणार, तर ज्‍यांनी समाजात जात्‍यंधपणा, आक्रस्‍ताळेपणा पसरवला, समाजात दहशत निर्माण केली, त्‍यांना देणार का ? काँग्रेस सरकारच्‍या काळात ज्‍यांना पुरस्‍कार घोषित व्‍हायचे, त्‍यांची पार्श्‍वभूमी पाहिली, तर पुरस्‍कार घोषित करून व्‍यक्‍तीचा सन्‍मान केला कि पुरस्‍काराचे अवमूल्‍यन केले ? अशी परिस्‍थिती होती. आताचे शासनकर्ते चांगल्‍या आणि कर्तृत्‍ववान व्‍यक्‍तींची निवड करत आहेत. जात्‍यंध संघटनेचे म्‍हणणे आहे, ‘पू. अप्‍पासाहेब संघाचे कार्य करतात, रामदासी बैठका घेतात, सर्वसामान्‍यांची दिशाभूल करतात. पुरस्‍कार द्यायचा झाल्‍यास तो पुरुषोत्तम खेडेकर, प्राच्‍यविद्या तज्ञ डॉ. आ.ह. साळुंखे, इतिहास संशोधक मा.म. देशमुख इत्‍यादींना दिला पाहिजे.’ संभाजी ब्रिगेडने ज्‍या नावांची सूची दिली आहे, त्‍यातील सर्वच जणांनी जात्‍यंधपणा जोपासून त्‍या आधारे समाजात फूट पाडण्‍याचाच प्रयत्न केला आहे. खेडेकर यांनी तर ‘शिवधर्म’ नावाचा तथाकथित धर्म काढून हिंदूंची दिशाभूल करण्‍याचा मोठा प्रयत्न केला; मात्र श्रद्धावान हिंदूंनी त्‍यांना भीक घातली नाही.  त्‍यामुळे त्‍यांंना स्‍वत:चे नाटक लवकर गुंडाळावे लागले. आ.ह. साळुंखे तर हिंदु धर्मावर वाटेल ती टीका करण्‍यासाठी प्रसिद्ध आहेत. मा.म. देशमुख यांनी खोटा इतिहास मांडून जनतेसह हिंदूंची दिशाभूल केली. ‘समर्थ रामदासस्‍वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काहीच संबंध नाही’, असे सांगण्‍यापर्यंत ब्रिगेडींची मजल गेली आहे. त्‍यामुळेच त्‍यांचा समर्थ रामदास्‍वामी यांच्‍या ग्रंथावर निरुपण करणार्‍यांना विरोध असणार, हे जगजाहीर आहे. यापूर्वी याच ब्रिगेडींनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्‍ट्र भूषण’ देण्‍यास विरोध केला होता. कारण का ? तर म्‍हणे त्‍यांनी विकृत इतिहास लिहिला, शिवरायांचा अवमान केला. समर्थ रामदासस्‍वामी यांनी छत्रपतींना मार्गदर्शन केल्‍याचे पुरावे उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे ‘रामदासस्‍वामींना विरोध करणे म्‍हणजे छत्रपतींना विरोध केल्‍याप्रमाणे आहे’, हे ब्रिगेडींनी लक्षात घ्‍यावे. याच ब्रिगेडींना सहस्रो हिंदूंचे हत्‍याकांड करणारा टिपू सुलतान जवळचा वाटतो, यात आश्‍चर्य ते काय ? यातून ब्रिगेडींचा केवळ पू. अप्‍पासाहेब यांना पुरस्‍कार देण्‍यालाच विरोध नाही, तर हिंदु धर्माचे कार्य जो कुणी करील, त्‍याला विरोध आहे. दुसर्‍या शब्‍दात हिंदु धर्मालाच विरोध आहे. हिंदु धर्माचा प्रसार आणि संवर्धन यांचे कार्य ब्रिगेडींना चालत नाही; कारण त्‍यांचा स्‍वत:चा ‘अजेंडा’ हिंदु धर्म संपवण्‍याचा आहे. ‘ब्रिगेडींना हिंदुत्‍व नको आहे’, हे सर्वसामान्‍य हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. अशा हिंदु धर्मविरोधकांविरुद्ध प्रत्‍येक वेळी संघटित झाले पाहिजे आणि त्‍यांच्‍या प्रत्‍येक आक्षेपांना उत्तर देऊन जनतेची दिशाभूल रोखली पाहिजे. हिंदूंना सन्‍मार्गाला लावण्‍याचे कार्य पू. अप्‍पासाहेबांनी केले आहे. धर्मासाठी भूषणावह कार्य करणार्‍यांना पाठिंबा देण्‍यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येणे, ही काळाची आवश्‍यकता आहे !

हिंदू संप्रदायाच्या कार्याला विरोध करणाऱ्या जात्‍यंध संघटनांवर शासनकर्त्यानी कठोर कारवाई करणे आवश्‍यक !