छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

शिवजयंतीच्या औचित्याने शिवसृष्टीचे लोकार्पण

पुणे, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर ते विचार आहेत. हे विचार स्वधर्म, स्वभाषा आणि स्वदेश यांसाठी जगण्याचे आणि बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान आहेत. छत्रपतींनी केवळ ५० वर्षांमध्ये अनेक लढायांचे नेतृत्व केले असे नव्हे, तर त्या कालखंडामध्ये पराभूत मानसिकता पालटून जनतेला ऊर्जा देण्याचे, हिंदूंना अपमानित करणार्‍यांना धडा शिकवण्याचे, तसेच स्वधर्मासाठी वेळप्रसंगी मरण पत्करण्याचाही आदर्श निर्माण केला आहे. आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. हे कार्य ‘दैवी’ माणसे घडवू शकतात. छत्रपती हे दैवी होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. येथील ‘शिवसृष्टी’तील ‘सरकारवाड्या’च्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

अमित शहा पुढे म्हणाले की, परकियांनी उद्ध्वस्त केलेल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे. त्यांना स्वराज्य स्थापन करायचे होते. त्यांनी कधीही साम्राज्य विस्तारासाठी युद्ध केले नाही. स्वराज्य म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार, धर्मानुसार राज्य चालवणे ! त्यांनी संस्कृत भाषेला महत्त्व दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम राज्यकारभार चालवण्याकरता ‘अष्टप्रधान मंडळ’ स्थापन करून राज्यकारभार चालवणे, ही अद्भूत कल्पना अमलात आणली. छत्रपतींनी त्यांच्या जीवनकाळात संत-परंपरांचे संरक्षण आणि संवर्धनही केले. ते खरे उपभोगशून्य स्वामी होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य हे त्यांचे या देशावरील ऋण ! – अमित शहा

‘शिवसृष्टी’ ही संकल्पना बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर हिंडून, फिरून शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत करण्याचे कार्य केले आहे. त्यांनी हे कार्य केले नसते, तर अनेकांना छत्रपती आणि त्यांचे कार्यकर्तृत्व समजले नसते. त्यांचे देशावर हे उपकारच आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खर्‍या अर्थाने छत्रपतींचे जीवन, लढाईतील प्रसंग, तसेच राज्य व्यवस्थापन, राज्य कारभारशैली, दूरदृष्टी, शौर्य हे नव्या पिढीसमोर येईल. ही ‘शिवसृष्टी’ केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील शिवप्रेमी आणि शिवअभ्यासक यांना प्रेरणा देईल.

छत्रपती शिवरायांचे कार्य ही महाराष्ट्राची ओळख ! – मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

छत्रपती शिवरायांचे कार्य हीच महाराष्ट्राची ओळख आणि अभिमान आहे. त्यांनी निर्माण केलेले गडकोट, किल्ले, आरमार, जल व्यवस्थापन हे पहता ते उत्तम संघटक आणि दूरदृष्टीचे राजे होते.

छत्रपतींचे कार्य अंधारातून प्रकाशाकडे नेणारे ! – उपमुख्यमंत्री फडणवीस

छत्रपतींचे कार्य हे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला राष्ट्रतेज आणि शिवतेज मिळते. हेच शिवतत्त्व आपल्याला प्रेरणा देणार आहे.