आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे उद्गार : भारतियांनो, मी तुमच्यासाठी आपला प्राण का देऊ नये ?

१७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन झाला. त्या निमित्ताने…

वासुदेव बळवंत फडके

‘भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे वासुदेव बळवंत फडके या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील कारागृहात डांबून ठेवले होते. बंदिवासात असतांना कारागृहातून पळून जाण्याचा मोठा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केल्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर अधिक बंधने लादली होती. जीवन अधिक त्रासाचे आणि कष्टाचे झाले होते. दुर्धर क्षयरोगाने त्यांना गाठले. वासुदेव बळवंत यांना आता कुठलीही आशा राहिली नव्हती. घरदार शेकडो मैलांवर दूर होते. मृत्यूची वाटचाल करणारे वासुदेव बळवंत इंग्रज सरकारवर मनातून चरफडत होते. आपल्या मृत्यूनंतरही जुलमी इंग्रजी सत्तेस सुख मिळू नये, यासाठी जणू देवाची प्रार्थना त्यांनी आरंभली होती. माघ कृष्ण एकादशी या दिवशी त्यांच्या अंगातील ताप वाढला आणि दुपारी ४.३० वाजता त्यांचे निधन झाले.

देशासाठी प्राणार्पण करणार्‍या क्रांतीकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे स्थान पहिले आहे. ‘‘दधिची ऋषींनी आपल्या अस्थी देवासाठी दिल्या. मग हे भारतियांनो, मी तुमच्यासाठी आपला प्राण का देऊ नये ?’’, असे त्यांचे उद्गार आहेत. शिरढोण येथील त्यांच्या स्मारक स्तंभापुढे भाषण करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उद्गार काढले, ‘‘आमच्या हृदयातील स्वातंत्र्याकांक्षेची ज्योत ही वासुदेव बळवंतांच्या हृदयातील ज्योतीने उत्स्फूर्त झाली.’’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))