अदानी प्रकरणात मोदी यांना उत्तर द्यावे लागेल !’ – जॉर्ज सोरोस, अमेरिकी अब्जाधीश

भारताच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करणार्‍या अमेरिकी अब्जाधिशाचा थयथयाट !

डावीकडून जॉर्ज सोरोस, गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

बर्लिन – अमेरिकेचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी अदानी समूहाच्या प्रकरणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी अदानी प्रकरणावर मौन बाळगून आहेत; पण त्यांना परदेशी गुंतवणूकदार आणि संसद यांना उत्तर द्यावेच लागेल. पंतप्रधान मोदी हे भांडवलदारांना झुकते माप देत आहेत. मोदी आणि अदानी यांचे चांगले संबंध आहेत. यामुळे भारतात मोदी यांची सरकारवरील पकड नक्कीच कमकुवत होईल.

२४ जानेवारी या दिवशी ‘हिंडेनबर्ग रिसर्च संस्थे’चा अहवाल प्रसारित झाला. त्यामध्ये अदानी समूहावर शेअर्सच्या किमतीमध्ये फेरफार करून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे अदानी समूहाचे बाजारमूल्य झपाट्याने खाली आले, तसेच जागतिक श्रीमंत व्यक्तींच्या सूचीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या गौतम अदानी यांना पायउतार व्हावे लागले होते. विरोधक गौतम अदानी यांच्या गेल्या काही वर्षांतील प्रगतीला पंतप्रधान मोदी यांना कारणीभूत ठरवत आहेत.

भाजपकडून सोरोस यांच्यावर टीका

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

सोरोस यांनी केलेले वक्तव्य हे भारतीय लोकशाही प्रक्रियेवर आघात करणारे वक्तव्य आहे. भारताने अशा परकीय शक्तींचा पराभव केला आहे. अशा शक्तींनी यापूर्वीही भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते आता पुन्हा करत आहेत. मी प्रत्येक भारतियाला जॉर्ज सोरोस यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याची विनंती करते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले.

संपादकीय भूमिका 

अमेरिकेतील राजकीय पक्ष आणि उद्योजक यांचे हितसंबंध अन् त्यामुळे होणारे लाभ ही काही नवीन गोष्ट नाही ! सोरोस यांनी भारतातील राजकीय आणि उद्योजक यांच्या हितसंबंधांवर भाष्य करत वेळ घालवण्यापेक्षा यावर भाष्य करून तेथील परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न करावा !