‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार अन् त्यांचे खरे मानकरी !

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

१. ‘पद्मविभूषण’ पुरस्काराचे विशेष महत्त्व !

‘केंद्र सरकारने वर्ष १९५४ पासून ‘पद्म’ पुरस्कार देण्यास प्रारंभ केला. हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते २६ जानेवारीला देण्यात येतात. ‘भारतरत्न’च्या नंतर हा दुसरा प्रतिष्ठित सन्मान आहे. आतापर्यंत २४२ जणांना हे पुरस्कार देण्यात आले. सर्वप्रथम साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या बंगालच्या सत्येंद्रनाथ बोस यांना पहिला पुरस्कार मिळाला. वर्ष २०२३ मध्ये हा ‘पद्मविभूषण’ पुरस्काराचा मान समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायमसिंह यादव यांना मिळाला आहे.

‘पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’ या पुरस्कारांच्या संदर्भात राज्य सरकार, संघराज्य प्रशासन आणि केंद्रीय मंत्रालय यांच्या एकत्रित बैठकीत विचार विनिमय होतो. त्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. समिती या सर्व शिफारसींचा विचार करते. त्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री आणि राष्ट्र्रपती यांना अनुमोदन देतात अन् २६ जानेवारी या दिवशी हे पुरस्कार दिले जातात. वर्ष २०१७ नंतर राज्य आणि केंद्र सरकार यांच्या जोडीला सामान्य नागरिकही हे पुरस्कार कुणाला मिळावेत, यासाठी शिफारस करू शकतात.

२. समाजासाठी उल्लेखनीय कार्य केल्याविषयी ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या महनीय व्यक्ती !

यापूर्वी ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार महर्षि धोंडो केशव कर्वे, रतन टाटा, घनश्यामदास बिर्ला, जॉन मथाई, व्ही.आर्. कृष्णा अय्यर, महादेव श्रीहरि अणे, विक्रम साराभाई, लष्करप्रमुख सॅम माणेकशा, सुब्बालक्ष्मी, उस्ताद बिस्मिल्ला खान, शास्त्रज्ञ सतीश धवन, पंडित बिरजू महाराज, प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, अटलबिहारी वाजपेयी, गोविंदभाई श्रॉफ, लक्ष्मी सहगल, उषा मेहता, गानकोकिळा लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, नानाजी देशमुख, पंडित जसराज, हरिप्रसाद चौरसिया, ऋषिकेश मुखर्जी, किशोरी आमोणकर, जयंत नारळीकर, फली नरिमन, विश्वनाथ आनंद, सचिन तेंडुलकर, अनिल काकोडकर, माधवन् नायर आणि अजीझ प्रेमजी यांना मिळालेला आहे.

३. श्रीरामभक्तांवर गोळीबार करण्याचे आदेश देणारे मुलायमसिंह यांना ‘पद्मविभूषण’ दिला !

वर उल्लेख केलेल्या महनीय व्यक्तींनी क्रीडाक्षेत्र, नाट्य, लोकसेवा, साहित्य, अवकाश, संशोधन, उद्योग आदी अनेक महत्त्वाच्या आणि मानवजातीच्या कल्याणकारी संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. असे असतांना समाज आणि भक्त यांच्या दृष्टीने घृणास्पद काम करणार्‍या मुलायमसिंह यादव यासारख्या व्यक्तीला हा पुरस्कार कसा मिळाला ? मुलायमसिंह यादव हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असतांनाच्या कार्यकाळात राममंदिराच्या बांधकामासाठी कारसेवा करणार्‍या कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यात अनेक रामभक्त मृत्यूमुखी पडले. त्यात कोठारी बंधूंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हे जगजाहीर असतांना सध्याच्या केंद्र सरकारने कोणत्या निकषाखाली मुलायमसिंह यादव यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरवित केले ? हे कळत नाही. हे पाहून कोठारी बंधू आणि समस्त कारसेवक ज्यांनी राममंदिराच्या बांधकामासाठी देहत्याग केला, त्यांच्या आत्म्याला क्लेश होत असेल.

४. मुलायमसिंह यांना ‘पद्मविभूषण’ मिळणे, हा पुरस्कारप्राप्त मानकर्‍यांचा अवमान !

मुलायमसिंह यादव यांना ‘पद्मविभूषण’ देण्यामागे कोणतेही कारण असेल; परंतु आजपर्यंत ज्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, त्यांचा हा अवमान आहे, असे सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः रामभक्त यांना वाटत असेल, तर त्यात चुकीचे काय ? हिंदु राष्ट्रात अशा धर्मद्रोह्यांना शिक्षा होईलच; पण ‘कर्मफलन्याय’ सिद्धांतानुसार त्यांना मृत्यूनंतरही पुढच्या योनीत गेल्यावर भोग भोगावेच लागतील. धर्मशास्त्रानुसार तेव्हाच हा देवाणघेवाण हिशोब पूर्ण होऊ शकतो. ‘ते या लोकशाहीत गौरवित झाले असतील; पण त्यांना देव नक्की शिक्षा देणार’, असा सर्वसामान्य नागरिक आणि रामभक्त यांचा विश्वास आहे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय. (१०.२.२०२३)