सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रखर प्रवक्ते  प.पू. माधवराव सदाशिव गोळवलकर !

आज १६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी रा.स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकरगुरुजी यांची जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

प.पू. माधवराव सदाशिव गोळवलकर

१. प्रारंभीचे जीवन

‘पू. माधव यांचा जन्म नागपूरमध्ये पिता श्री. सदाशिवराव गोळवलकर यांची पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला होता. त्यांचा परिवार मूळचा कोकणातील ‘गोळवली (जिल्हा रत्नागिरी)’ येथील असून ते नागपूरमध्ये स्थायिक झाले होते; म्हणून त्यांच्या नावासह ‘गोळवलकर’ हे आडनाव जोडले गेले.

२. बुद्धीवान विद्यार्थी जीवन

विद्यालयात चि. माधवच्या बुद्धीमत्तेचे किस्से विख्यात होते. शाळेतील गुरुजींनी वर्गातील फळ्यावर प्रश्न लिहिल्याबरोबर चि. माधव याने अनेकदा उत्तर दिले होते. एकदा विद्यालयात शाळेची तपासणी करायला निरीक्षक आले होते. त्या दिवशी चि. माधवला पुष्कळ ताप आल्यामुळे तो शाळेत आला नव्हता. मुख्याध्यापकांनी ४ विद्यार्थी पाठवून बालक माधवला खाटेवर झोपवून शाळेत बोलावून घेतले, ज्यामुळे शाळा तपासणीच्या वेळेस त्याची प्रतिभा दाखवता येऊ शकेल. निरीक्षक महोदयांनी चि. माधवच्या योग्यतेने प्रभावित होऊन प्रशंसा केली आणि त्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. इयत्ता ४ थीत शिकत असतांना चि. माधवने इंग्रजीत एक लेख लिहिला, ‘ॲडव्हेंचर ऑफ ए रुपी.’ संपूर्ण विद्यालयात तो चर्चेचा विषय झाला. विद्यालय आणि महाविद्यालयीन जीवनात चि. माधवचे भाषण, कला, लेखन आणि स्मृती यांविषयीचे अनेक किस्से विख्यात आहेत. पाठ्यक्रमाच्या शिक्षणासह त्यांनी धार्मिक अध्ययन सुद्धा केले होते. ज्यामध्ये हिंदु धर्मग्रंथांच्या व्यतिरिक्त ‘बायबल’ आणि ‘कुराण’ यांचेही अध्ययन समाविष्ट आहे.

३. माधवरावांना ‘श्री गुरुजी’ असे संबोधणे

प्राणीविज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर माधवराव यांनी काशी विश्वविद्यालयात अध्यापनाचे कार्य आरंभ केले. काशी विश्वविद्यालयाच्या विशाल ग्रंथालयातील सर्व पुस्तके श्री. माधवराव सदाशिव गोळवलकर यांनी वाचली होती. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत प्रखर होती. कोणताही नवीन विषय एकदा वाचल्यानंतर ते त्यातील संदर्भ हुबेहूब पृष्ठ क्रमांकासहित सांगत होते. त्यांची कर्तव्यपरायणता, मधुर व्यवहार आणि विद्यार्थ्यांप्रती सहकार्याची भावना असल्यामुळे विश्वविद्यालयातील विद्यार्थी त्यांना ‘श्री गुरुजी’ असे संबोधित करू लागले.

४. डॉ. हेडगेवार यांच्याशी संपर्क

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार हे संघटन करण्याची क्षमता असणार्‍या श्रेष्ठ चरित्रवान युवकांना संघ कार्याच्या दृष्टीने शोधतच होते. डॉक्टरांच्या काशी प्रवासाच्या वेळी श्री. माधवरावांशी संपर्क आला. श्री. माधवसुद्धा त्यांच्या व्यक्तीमत्त्वामुळे प्रभावित झाले होते. हिंदुत्व आणि राष्ट्र्रीयता यांच्या संदर्भात वेळोवेळी श्री. माधव नागपूरमध्ये डॉ. हेडगेवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करत होते. श्री. माधव हे मूलतः आध्यात्मिक संस्कारांचे होते. त्यामुळे एकदा सर्व सोडून त्यांनी कोलकाताच्या जवळ सारगाछीमध्ये श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी अखंडानंद (स्वामी विवेकानंद यांचे गुरुबंधू) यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी १३.१.१९३७ या दिवशी संन्यासाची दीक्षा घेतली.

५. पुन्हा डॉ. हेडगेवार यांच्या सान्निध्यात येणे 

जरी पू. माधवराव यांनी संन्यास घेतला असला, तरी ते डॉ. हेडगेवार यांच्या चुंबकीय प्रभावापासून मुक्त झालेले नव्हते. तिकडे त्यांचे गुरु स्वामी अखंडानंद यांच्या कठोर परीक्षेनंतर त्यांनी संन्यासाची दीक्षा देऊन पू. माधवराव यांना सांगितले, ‘‘तुम्हाला हिमालयाच्या पर्वत शिखरांवर तपस्या करायची नाही, तर समाजसेवेचे एक महान कार्य तुमच्याद्वारे होणार आहे.’’ सामान्य आणि सरळ दिसणारे डॉ. हेडगेवार यांच्या मनात देशाप्रती करुणा अत्यंत भरलेली होती. डॉक्टरांचा निकट संपर्क आणि महानता यांनी प्रभावित होऊन पू. माधवराव यांनी मनातल्या मनात त्यांना स्वतःचे ‘गुरु’ मानले. त्यामुळेच डॉ. हेडगेवार यांनी सोपवलेली संघकार्याची विविध दायित्वे त्यांनी अगदी मनापासून आणि समर्पणभावाने निभावली. डॉ. हेडगेवार यांचे स्वास्थ्य २०.६.१९४० या दिवशी फारच खालावले आणि त्यांनी संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून पू. माधवराव सदाशिव गोळवलकर यांना स्वतःचा ‘उत्तराधिकारी’ म्हणून नियुक्त केले.

६. रा.स्व. संघाचे प्रमुख म्हणून कार्य विस्तारणे

१.६.१९४० या दिवशी डॉ. हेडगेवार यांच्या देहांतानंतर श्री गुरुजींना ३.७.१९४० या दिवशी नागपूरमध्ये संघप्रमुख, म्हणजेच ‘सरसंघचालक’ दायित्व विधीवत् सोपवण्यात आले. श्री गुरुजींची इथपासून अखंड यात्रा आरंभ झाली आणि ते संपूर्ण भारताचे वर्षातून २ वेळा भ्रमण करू लागले. त्यांच्या या अखंड यात्रेला नदी-नाले, पाऊस आणि आजारपण सुद्धा थांबवू शकले नाहीत. देशाच्या विभाजनापूर्वी उद्भवलेल्या सांप्रदायिक दंगली आणि अखंड देश विभाजनाच्या संकटाच्या वेळी स्वयंसेवकांचे योग्य नेतृत्व करतांना त्यांनी देशाच्या प्रत्येक प्रांतात तालुका स्तरापर्यंत संघकार्य विस्तारित केले.

७. संघकार्य व्यापक बनवणे

रा.स्व. संघाला प्रांतापासून जिल्हा आणि तालुका स्तरापर्यंत विस्तारित करण्याच्या व्यतिरिक्त समाजाच्या सर्व वर्गांचा व्यापक सहयोग घेतला. यातून त्यांनी सनातन भारतीय मूल्यांना स्थापित करण्याच्या उद्देशाने समाजातून विभिन्न क्षेत्रांमध्ये संघटन उभे केले. ज्यामध्ये ‘विश्व हिंदु परिषद’, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘भारतीय मजूर संघ’ आणि ‘जनसंघ’ हे मुख्य आहेत. वर्ष १९६६ मध्ये गोहत्या विरोधाचे पुष्कळ मोठे आंदोलन श्री गुरुजींच्या प्रेरणेने साधूसंतांच्या नेतृत्वात संचलित करण्यात आले होते. ऐतिहासिक देवी कन्याकुमारीच्या तपोस्थळावरून अतिक्रमणे हटवून तेथे भव्य देवी मंदिर आणि विवेकानंद शिला स्मारक बनवण्याचे दुहेरी कार्य श्री गुरुजींच्या प्रेरणेने श्री. एकनाथ रानडे यांनी संपादित केले. देशभरात विशेषतः वनवासी बंधूंना विदेशी मिशनर्‍यांच्या जाळ्यापासून वाचवण्यासाठी ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना केली. त्या माध्यमातून दुरावलेल्या बंधूंचे हिंदु धर्मात पुनर्प्रवेशाचे कार्यही श्री गुरुजींच्या प्रेरणेने करण्यात आले.

८. संघावर बंदी आणि न्यायालयाकडून दोषमुक्तता

रा.स्व. संघाची वाढती लोकप्रियता देशाच्या राजकीय नेतृत्वाला सहन झाली नाही आणि वर्ष १९४८ मध्ये म. गांधी यांच्या हत्येच्या खोट्या आरोपाखाली श्री गुरुजींना कारागृहात ठेवण्यात आले. त्या वेळी संघाच्या स्वयंसेवकांवर सरकारी दडपशाही कार्यवाहीत आणली गेली. संघाच्या शाखांवर प्रतिबंध लावण्यात आले होते. श्री गुरुजींनी स्वयंसेवकांना धैर्य ठेवून हिंसक प्रतिक्रिया देण्यास रोखतांना म्हटले, ‘‘सरकारी लोक सुद्धा आपलेच आहेत. जर जीभ दातांच्या मध्ये चावली गेली, तर आपण दात तोडत नाही.’’ स्वयंसेवकांनी देशव्यापी अहिंसक सत्याग्रह केला. न्यायालयाने श्री गुरुजी आणि संघ यांना दोषमुक्त केले. अनेक सल्ले आणि दबाव येऊनही श्री गुरुजींनी संघाच्या अराजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपाला अखंड ठेवत संघ कार्य द्रुतगतीने वाढवले.

९. पू. गुरुजींचे महाप्रयाण  

अखंड प्रवास आणि अथक श्रम यांमुळे पू. माधवराव गोळवलकरगुरुजींचे शरीर अत्यंत क्षीण आणि कर्करोगासारख्या त्रासदायक रोगाने पीडित झाले होते. जरी त्यांची प्रवासाची गती न्यून झाली, तरी अंतिम वेळेपर्यंत त्यांचे राष्ट्रसाधनेचे कार्य अखंडपणे चालूच होते. पू. माधवराव सदाशिव गोळवलकर यांनी ५.६.१९७३ या दिवशी महाप्रयाण केले.’

– डॉ. श्रीलाल, संपादक, गीता स्वाध्याय

(साभार : वर्ष १०, अंक १०-११, जानेवारी-फेब्रुवारी २०२०)