नाशिक महापालिकेच्‍या करवसुली विभागाकडून १५० कोटी रुपयांची वसुली !

पाणीपट्टी न भरणार्‍या ४१२ घरांचे पाणी बंद !

नाशिक – येथील महापालिकेच्‍या करवसुली विभागाने यंदा फेब्रुवारीत १५० कोटी रुपयांची करवसुली केली असून आर्थिक वर्षाअखेरीसाठी अजून ५० दिवस शेष असल्‍याने आणखी २५ कोटी रुपये वसूल होण्‍याची शक्‍यता आहे. अलीकडच्‍या काळात ही विक्रमी वसुली मानली जात आहे. गेल्‍या वर्षी मार्चपर्यंत १४९ कोटी रुपये वसुली करण्‍यात आली होती.

१. महापालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्‍या आदेशाने करवसुली विभागाने शहरातील अनधिकृत नळजोडण्‍यांच्‍या विरोधात कारवाई चालू केली आहे.

२. वर्षानुवर्षे कर थकवणार्‍या बड्या थकबाकीदारांची सूची सिद्ध करून त्‍यांच्‍या घरासमोर ‘ढोल बजाव’ अभिनव आंदोलन करण्‍यात आले. काहींनी वसुलीला हातभार लावला. तरीही ५९ सहस्र मिळकतधारकांकडे अनुमाने १५० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्‍याने त्‍यांना नोटिसा बजावत मालमत्ता जप्‍तीची चेतावणी देण्‍यात आली.

३. पालिकेने अनधिकृत नळजोडणीही बंद करण्‍यासाठी प्रारंभ केल्‍याने मालमत्ताधारक  थकबाकी भरू लागले. यातूनच वरील प्रमाणात वसुली झाली.

४१२ थकबाकीदारांची नळजोडणी तोडली !

मोठी थकबाकी असलेल्‍या आणि पाणीपट्टीची रक्‍कम न भरणार्‍या ४१२ नळजोडण्‍या तोडून संबंधितांचा पाणीपुरवठा बंद करण्‍यात आला. आतापर्यंत ४४ कोटी रुपयांची वसुली झाली असून त्‍यासाठी ४ सहस्र १३ नळधारकांना नोटिसा बजावण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यापैकी ३ सहस्र ५२१ नळधारकांनी थकित रक्‍कम अदा केली.

शासकीय कार्यालयांकडे २१ कोटींची थकबाकी कायम !

शहरातील विविध शासकीय कार्यालयांकडे अनुमाने २१ कोटी रुपयांची करवसुली थकीत आहे. त्‍यासाठी महापालिकेच्‍या करवसुली विभागाने खातेप्रमुखांना पत्र पाठवून रक्‍कम भरण्‍याची विनंती केली आहे; मात्र त्‍याला शासकीय कार्यालयांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. मार्चपर्यंत भरणा करण्‍याची कार्यालयांना मुदत देण्‍यात आली असून मनपा आयुक्‍तांच्‍या स्‍वाक्षरीचे स्‍मरणपत्रही पाठवण्‍यात आले आहे. (स्‍मरणपत्र पाठवण्‍याची वेळच का येते ? कार्यालये स्‍वतःचे कर्तव्‍य पार का पाडत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षाही व्‍हायला हवी !

  • कोट्यवधी रुपयांची वसुली न रहाण्यासाठी काय उपाययोजना काढणार ? हे प्रशासनाने सांगायला हवे !