म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीचा खारटपणा वाढणार !

  • म्हादई जलवाटप तंटा

  • म्हादई जलवाटप तंटा राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञाचा दावा

पणजी – कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवल्यास गोव्यातील ६ तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुमार यांनी म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीच्या पाण्याचा खारटपणा वाढण्यासह पाणी वळवल्याने वन क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. चिंबल पंचायतीची नुकतीच विशेष ग्रामसभा झाली. यामध्ये राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुमार यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘म्हादईचे पाणी वळवल्यास मांडवी नदीच्या पाण्याची क्षारता वाढेल. त्यामुळे पश्चिम घाट आणि अन्य वनांतील वन्यजीव यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हादईचे पाणी वळवल्याने विहिरी आणि अन्य जलस्रोत सुकणार आहेत.’’ म्हादईच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी चिंबल पंचायतीप्रमाणे अनेक पंचायती पुढे सरसावल्या आहेत. म्हादईप्रश्नी चिंबल पंचायतीने १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता आणखी एका बैठकीचे आयोजन केले आहे आणि पुढील बैठकीत म्हादईच्या संवर्धनाचा ठराव घेण्याचे ठरवले आहे.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा