योगऋषी रामदेवबाबा यांचे मिरामार समुद्रकिनार्‍यावर नि:शुल्क योग महाशिबिर !

पतंजलि योग पीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी पू. स्वामी परमार्थ देवजी महाराज यांची माहिती

डावीकडून कमलेश बांदेकर, माहिती देतांना पू. स्वामी परमार्थ देवजी महाराज आणि विश्वास कोरगावकर

पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – योगऋषी रामदेवबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पहाटे ५ ते सकाळी ७.३० या वेळेत मिरामार समुद्रकिनार्‍यावर नि:शुल्क योग महाशिबिर होणार आहे. १८ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७.३० ते रात्री १० या वेळेत प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा भजनांचा कार्यक्रम होणार आहे. समस्त गोमंतकियांनी या योग महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘पतंजलि योग पीठा’चे मुख्य केंद्रीय प्रभारी पू. स्वामी परमार्थ देवजी महाराज यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला ‘पतंजलि योग समिती, गोवा’चे अध्यक्ष विश्वास कोरगावकर, ‘पतंजलि योग समिती’ची शाखा ‘युवा भारत’चे अध्यक्ष सनी सिंग, ‘भारत स्वाभिमान’चे उपाध्यक्ष गिरीश परूळेकर आणि गोवा प्रभारी कमलेश बांदेकर यांची उपस्थिती होती.


पू. स्वामी परमार्थ देवजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘योग आणि अध्यात्म यांचे आचरण अन् सात्त्विक आहार घेतल्यास आपले जीवन निरोगी होऊ शकते. संपूर्ण जग आज योगाचे आचरण करून स्वतःचे जीवन निरोगी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘घराघरांत योग पोचून प्रत्येक व्यक्तीचे जीवन निरोगी व्हावे’, असा संकल्प घेऊन या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोगाला मुळापासून नष्ट करण्याचे सामर्थ्य असलेली आणि ‘साईड इफेक्ट’ नसलेली सद्गुण चिकित्सा, आहार, विचार, संस्कार, योग, आयुर्वेद, नॅचरोपॅथी आदी नैसर्गिक चिकित्सा पद्धती संपूर्ण जगात प्रचलित होत आहेत. ‘पतंजलि योग पीठ’ हे जगातील सर्वांत मोठे योगपीठ आहे. योगऋषी रामदेवबाबा जीवन जगण्याची कला, नैतिक मूल्ये, प्राचीन परंपरेची शिकवण स्वत:च्या आचरणातून सर्वांना शिकवत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ‘संपूर्ण गोवा योगमय बनवून प्रत्येक गोमंतकीय रोगमुक्त व्हावा’, असे वाटते आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांमुळे योग महाशिबिराचे आयोजन होत आहे.’’