नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या समाज विकास विभागाच्‍या वतीने विविध घटकांतील विद्यार्थ्‍यांसाठी शैक्षणिक शिष्‍यवृत्ती योजना घोषित करण्‍यात आली आहे. शैक्षणिक शिष्‍यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून देण्‍याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्‍याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त संजय काकडे यांनी दिली.

१. शैक्षणिक शिष्‍यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देण्‍याचे आवाहन महानगरपालिकेने केले होते. यासाठी प्रथम ३१ जानेवारी आणि त्‍यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्‍यात आली होती; मात्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्‍यात विद्यार्थ्‍यांना विविध कारणांमुळे विलंब होत असल्‍याच्‍या तक्रारी महापालिकेकडे करण्‍यात आल्‍या आहेत.

२. यामध्‍ये विद्यार्थ्‍यांना बँकेत खाते उघडण्‍यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागणे, उत्‍पन्‍नाचा दाखला वेळेत उपलब्‍ध होणे अशी कारणे आहेत.

३. अद्यापपर्यंत वर्ष २१-२२ चे २३ सहस्रांपर्यंत आणि २२-२३ चे २५ सहस्रांपर्यंत अर्ज ऑनलाईनने प्राप्‍त झाले आहेत. मागील वर्षी या योजनेसाठी ३७ सहस्र अर्ज प्राप्‍त झाले होते, अशी माहिती उपायुक्‍त दादासाहेब चाबुकस्‍वार यांनी दिली.

४. अर्ज भरण्‍यात विद्यार्थ्‍यांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्‍याची मुदत वाढवण्‍याचा निर्णय आयुक्‍तांच्‍या मान्‍यतेने अतिरिक्‍त आयुक्‍त काकडे यांनी घेतला आहे.