‘सध्या दुसर्या शहरांमध्ये किंवा थेट विदेशात फिरायला जाण्याचा कल वाढत आहे. अशा वेळी उत्साहाच्या भरात अती चालणे, अती खाणे, अपुरी झोप आणि वेळी-अवेळी प्रवास यांमुळे आजारी पडण्याची शक्यता असते. तेव्हा सुट्ट्यांसाठी बाहेर पडतांना कोणती काळजी घ्यावी ? ते येथे देत आहोत.
१. पोशाख
आपण ज्या प्रदेशात जाणार असू त्याप्रमाणे कपडे, बूट, मोजे, स्वेटर, जॅकेट, टोपी आदी गोष्टींची बारकाईने काळजी घ्यावी. कपडे अतीघट्ट नसावेत. फिरतांना मोकळीक जाणवेल आणि आपल्या पोशाखाचा त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. उन्हाचा चष्मा, काठी, वॉकर इत्यादी आपल्याला आवश्यक वस्तू आवर्जून न्याव्यात. कपड्यांचेही अधिकचे संच ठेवावेत. तरण तलावात पोहतांना वेगळे कपडे वापरावेत. ओले, धुळीने माखलेले आणि घामट कपडे पुन्हा पुन्हा वापरू नयेत. त्यांचा संसर्ग होऊ शकतो. मोजेही सुखकर असावेत, घट्ट इलॅस्टिकचे नसावेत.
२. आहार
मधल्या वेळेत खाण्यासाठी सुका खाऊ समवेत ठेवावा. शक्यतो तेलकट किंवा तूपकट पदार्थ नसावेत. दीर्घकाळ टिकणारे (खजूर, राजगिरा चिक्की, शेंगदाणा चिक्की, कुरमुर्याचा चिवडा) पदार्थ समवेत घ्यावेत. बाहेर खातांना पचण्यास जड पदार्थ टाळावेत. पाणी पितांना स्वच्छतेची खात्री करून घ्यावी. शक्यतो खाण्याच्या वेळा पाळाव्यात. मसालेदार-तिखट पदार्थांचा अतिरेक टाळावा.
३. लसीकरण
विषमज्वर, काविळ, फ्लू यांचे नियमित लसीकरण करून घ्यावे. ज्येष्ठ नागरिक किंवा दम्याचा त्रास होणार्या व्यक्तींनी आवश्यक ते लसीकरण करून घ्यावे. बर्याचदा काळजी घेऊनही लहान-मोठ्या आजारांना प्रवासात सामोरे जावे लागते. अशा वेळी काही औषधे समवेत असणे उत्तम !
४. प्रवासात मळमळ आणि उलट्या होणे
काही जणांना बस, गाडी, विमान यांच्या प्रवासात मळमळ आणि कधी कधी उलट्याही होतात. अशांनी वाहनात बसण्यापूर्वी लिंबू आणि आले यांचा रस अन् साखर प्रत्येकी १ चमचा, तसेच २ चिमूट मीठ एकत्र करून पाणी घालून प्यावे. अनेकदा अपचनानेही असा त्रास होतो. अशा वेळी दालचिनी पूड समवेत ठेवावी. पाव चमचा पूड पाण्यासमवेत प्रत्येक २-३ घंट्यांनी घेता येते. आवळ्याची सुपारीही चघळून खाता येते.
५. जुलाब
प्रवासात जुलाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरारूट आणि मक्याचे सत्त्व नेहमी जवळ ठेवावे. १-१ चमचा दोन्ही एकत्र करून त्यात पाणी आणि साखर घालून प्यावे. जायफळ पूड (१ मोठा चमचा भरून) + गूळ (४ मोठे चमचे भरून) + सुंठ (२ छोटे चमचे) + तूप घालून वरील मिश्रणाच्या शेंगदाण्याएवढ्या गोळ्या कराव्या. दोन-दोन घंट्यांनी २-३ गोळ्या चघळून खाव्यात. अनेक दिवस या टिकत असल्याने प्रवासात नेण्यास शक्य असते.
६. अपचन
अनेकदा चुकीच्या वेळी किंवा अतीप्रमाणात अन्नसेवन केल्याने पोटफुगी, पोटदुखी, ढेकर येणे आणि अपचन यांमुळे छातीत किंवा पोटात असह्य दुखण्याचे त्रास होतात. यासाठी पुढीलप्रमाणे चूर्ण करून समवेत न्यावे. (बडीशेप चूर्ण + जिरेपूड + दालचिनी पूड + तमालपत्र चूर्ण) समप्रमाणात एकत्र करून डबीत भरून न्यावे. काळे मीठ ४ चिमूट आणि हे चूर्ण प्रत्येक जेवणानंतर १ चमचा असे घ्यावे.
७. मांसपेशींच्या वेदना
७ अ. उन्हात फिरून, बर्फात चालून किंवा अतीथकवा आल्याने मांसपेशी थकतात. अशा वेळी पाठदुखी, मानदुखी, पायात गोळे येणे, सांधे दुखणे असे विविध त्रास प्रवासात होण्याची शक्यता असते. पायांवर किंवा पावलांवर सूजही येते. अशा वेळी ‘एप्सम सॉल्ट’ची पाकिटे समवेत ठेवावी. (ही औषधांच्या दुकानात उपलब्ध असतात.)
७ आ. १ लिटर पाण्यात १ चमचा ‘एप्सम सॉल्ट’ पूड घालून त्यात पाय घालावे. बाथटब असेल, तर पाण्यात ती पूड घालून पडून रहावे अन्यथा या पाण्यात बुडवलेल्या पट्टया त्या त्या ठिकाणी ठेवाव्या. मांसपेशी मोकळ्या होऊन वेदना आणि सूज अल्प होते.
७ इ. २ ते ३ बँडेज आणि वेदनाशामक मलम समवेत बाळगावे. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) दिलेली औषधे नियमित वेळेवर घ्यावीत. आपल्याला एखादा आजार असेल, तर त्याविषयीचे औषध, त्याची चिठ्ठी आणि आधुनिक वैद्यांचा दूरध्वनी किंवा भ्रमणभाष क्रमांक आपल्या समवेत बाळगावा.
८. घशाचा संसर्ग
अनेक ठिकाणी तेलकट पदार्थ, तसेच वारंवार थंड पदार्थ आणि पेयांचे सेवनही केले जाते. अशा वेळी सर्दी होण्याचा धोका असतो, तसेच घसाही दुखतो आणि गिळतांना त्रास होतो. तेव्हा पुढीलप्रमाणे उपाय करावेत.
८ अ. लवंग + खडीसाखर चघळून खाता येते.
८ आ. रूमालात ओवा पुरचुंडी करून घ्यावा. त्याचा ‘इनहेलर’प्रमाणे वास घेण्यास उपयोग करता येतो. पुरचुंडी चुरून वास घेत रहावे.
८ इ. हळदीचे चूर्ण न्यावे. गरम पाण्यात घालून गुळण्या करता येतात आणि पोटातही गरम पाण्यासमवेत घेता येते.
९. कानाची काळजी
प्रवासात सतत कानावर वारे किंवा वातानुकूलित हवेचा झोत बसल्याने कानदुखी होण्याची शक्यता असते. यासाठी स्कार्फ किंवा ओढणी कानाभोवती गुंडाळावी. कानात कापसाचे छोटे बोळे घालावे. हिंगाचे २-४ खडे समवेत न्यावे. हे खडे कापसात गुंडाळून रात्री कानात घालून झोपावे. अनेकांना विमान प्रवासाने कानात दडे बसतात. अशा वेळी विमान उडतांना आणि उतरतांना खडीसाखर अन् लवंग चघळत रहावे.
१०. केसांची काळजी
प्रवासात धूळ साठल्याने केसांना हानी पोचते. प्रखर सूर्यप्रकाशातही अनेकदा फिरावे लागते, तर काही वेळा पाण्यातील खेळ आणि पोहणे यांमुळेही केसांवर विपरित परिणाम होतो. यामुळे मग केसांमध्ये खाज येते आणि अधिक प्रमाणात गुंता होतो. केस वेळेवर धुतले जातील, याची खबरदारी घ्यावी, तसेच केसांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने टोपी, ओढणी, स्कार्फ इत्यादींचा वापर अवश्य करावा. केस शक्यतो मोकळे सोडू नयेत. पाण्यात उतरण्यापूर्वी केसांना थोडे तेल लावावे.
११. प्रवासात काय टाळावे ?
अ. उघड्यावरील अन्नपदार्थ आणि अस्वच्छ पाणी
आ. झोप आणि जेवण यांच्या अवेळा
इ. सतत उन्हात आणि वार्यावर फिरणे
ई. अंगातील बळाच्या पलीकडे पायपीट करणे
उ. प्रत्येक नवीन पदार्थ खाल्लाच पाहिजे, असा अट्टहास करणे
ऊ. मसालेदार पदार्थ आणि थंड पेयांचा अतिरेकी वापर
१२. इजा होणे किंवा मार लागणे
सहलीमध्ये इजा होणे किंवा मुका मार लागणे, असे प्रसंग उद्भवतात. अशा वेळी खालील प्रकारे सोप्या गोष्टींचा वापर करावा.
१२ अ. तूप + हळद यांचे मलम न्यावे, जे व्रणांवर लावता येते.
१२ आ. सुंठपूड + तुरटी चूर्ण समप्रमाणात एकत्र करून न्यावे. गरम पाण्यामध्ये मलम सिद्ध करून मुका मार लागल्यास किंवा सूज आल्यास लावता येतो.
– वैद्या संजीवनी राजवाडे
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, १६.४.२०१९)