‘सकल हिंदु समाज’ अशा व्यापक शीर्षकाखाली हिंदूंचा मोर्चा २९ जानेवारी या दिवशी मुंबईत पार पडला. हा पहिला मोर्चा नाही आणि शेवटचाही असणार नाही. शांततामय वातावरणात पार पडलेल्या सकल मराठा मोर्चानंतर ‘आपल्याकडे अशा प्रकारे मोर्चा निघू शकतो’, हे यावरून पुनश्च अधोरेखित झाले. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्च्याचे माध्यम लोकशाहीला नवे नाही; मात्र सकल हिंदु समाजाचा मोर्चा सगळ्याच समाजाला नव्याने विचार करायला लावणारा आहे.
१. हिंदूंचे मोर्चे हिंदूंच्या एकीकरणासाठी
केंद्रात भाजपचे हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे. राममंदिर असो, काशी विश्वेश्वराच्या मंदिरांचा कायापालट असो, गंगेच्या आरतीला राष्ट्रीय अधिष्ठान देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे वर्तन असो, हिंदूंच्या भावनांची नोंद घेणारे सरकार आज देशात कार्यरत आहे. ‘मग या मोर्च्यांची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. हा प्रश्न सहज असला, तरी त्याला उत्तर नाही. याचे कारण हिंदु समाजाचे म्हणून काही प्रश्न आहेत आणि ते अस्तित्वाचे आहेत.
जर हिंदू समाज सुरक्षित राहिला, तर असे सरकारही सुरक्षित राहील. हिंदु समाजाच्या मानसिक सुरक्षेचे म्हणूनही काही प्रश्न आहेत. एखादा समाज जेव्हा एकवटतो, तेव्हा त्याची शक्ती एकीमुळे दुणावते. हा काही पहिला मोर्चा नाही. सांगली, पुणे, पेण अशा ठिकाणी यापूर्वी हे मार्चे निघाले आहेत. शांततापूर्ण मार्गाने स्वतःची क्षमता आणि शक्ती दाखवत हे मोर्चे निघत असतात. हिंदूंना ‘हिंदु’ म्हणून रस्त्यावर उतरण्याची सवय नाही. ही सवय या मोर्च्यातून विकसित होत आहे.
२. हिंदूंचे निघणारे मोर्चे हा लोकशाहीतील अधिकार
हिंदू वैध मार्गाने चालणारे आहेत. राज्यघटनेची कार्यवाही या देशात सुखासुखी होत असते; कारण येथील बहुसंख्य समाज हिंदू आहे. हिंदूंच्या भावनांचा आदर न करणारे सरकार हा हिंदूंसमोरील मोठा प्रश्न होता. हिंदूंनीच तो मतपेढीच्या मार्गाने सोडवला; मात्र राजकीय प्रश्न हा हिंदूंच्या समोरील एकमेव प्रश्न नाही. हिंदूंच्या अस्मितेचे म्हणून अनेक प्रश्न आहेत. पालटत्या काळानुसार हिंदूंसमोरील प्रश्नही पालटत आहेत. अशा प्रकारच्या मोर्चाचे आयोजन करण्याची प्रेरणा हीसुद्धा समकालीन प्रश्नांच्या उत्तरांची शोधप्रक्रियाच मानावी लागेल. श्रद्धा वालकर हित्या हत्येच्या प्रकरणानंतर ही भावना देशभर उसळून आली. ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या अभिव्यक्ती या वास्तव नसून तो कांगावा आहे’, असा समज सर्वदूर पोचवणारी एक जमात डाव्या विचारवंतांनी रूजवली आहे. अल्पसंख्यांकांच्या रक्षणार्थ ही मंडळी पुढे येत असतात; मात्र अशांच्या दाव्याच्या फुग्यांना टाचण्या लावण्याचे काम आफताब पूनावालासारखे लोक करत असतात. श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केल्यानंतर सामोर्या गेलेल्या ‘नार्को टेस्ट’मध्ये आफताबसारखा मुलगा जन्नतमध्ये मिळणार्या पर्यांचा उल्लेख करतो. आधुनिक शिक्षण, सामाजिक सुधारणांचा पूर्ण लाभ उचलायचा, मनाने मात्र समाजापेक्षा आपलेच धर्मवेडेपण जपणार्या एका लोकसमूहासमवेत हिंदु समाजाला जगायचे आहे. सकल हिंदू मोर्चाच्या निमित्ताने हिंदु समाज म्हणून एकत्र येऊन अशा संकटांची चाचपणी करायची संधी मिळत असेल, तर तो लोकशाहीतील त्यांचा अधिकार मानावा लागेल.
३. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘भूमी जिहाद’ यांद्वारे हिंदूंचा केला जाणारा छळ
हिंदूंसमोरच्या प्रश्नांची सूची मोठी आहे. सरकारवर अवलंबून न रहाता सर्वांत आधी या प्रश्नांची ओळख ‘एक हिंदू’ म्हणून करून घेणे आवश्यक आहे. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे समोर यायला लागली, त्या वेळी हा ‘कांगावा’ असल्याचा दावा अनेकांनी केला होता; मात्र इथे अनेक ‘आफताब पूनावाला’ निघाले आणि त्यांची काळी कृत्येच इतकी निर्घृण होती की, आतून कितीही वाटत असले, तरी त्यांची बाजू कुणीही घेऊ शकले नाही, असेच सूत्र आहे. ‘भूमी (लँड) जिहाद’द्वारे हिंदूंच्या जागा दबावाने, धाकाने आणि आपल्या धर्माचे वातावरण निर्माण करून बळकावण्याचे उद्योग चालूच आहेत. काश्मीर खोर्यात जे झाले, त्याच्या या लघु किंवा सूक्ष्म आवृत्त्या आहेत.
४. हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया बहुआयामी ठरणारी !
मुंबईच्या उत्साही गणेशोत्सवानंतर निघणार्या विसर्जनाच्या मिरवणूक काही लोकांना उन्मादी वाटतात; पण गिरणगावातून गिरगाव चौपाटीला नेल्या जाणार्या बाप्पाच्या मिरवणुकांचा इतिहास ज्यांना ठाऊक नाही, त्यांनी तो जाणून घ्यावा. ‘आम्ही हिंदू नाही’, असे सांगणार्या लहान-मोठ्या जातींचे समूह आणि त्यांना त्यांच्या मूळ प्रवाहापासून दूर नेण्याचे प्रयत्न करणारे करंटे हेही आज मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहेत. निसर्गपूजा मानणार्या समुदायांमध्ये विष पसरवण्याचे काम हे लोक करत असतात. हिंदूंच्या भावनिक प्रश्नांची उत्तरे मिळत असतांना हिंदूंचे रोजगार आणि अर्थकारण यांसारख्या प्रश्नांचीही उत्तरे आपल्याला शोधावी लागणार आहेत. २१ वे शतक हे जसे तंत्रज्ञानविषयी असेल, तसेच तेच ते आर्थिक अस्थिरतांचेही असेल. हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया जर अशी बहुआयामी ठरली, तर एक मोठी शक्ती म्हणून आकाराला येण्यापासून हिंदु समाजाला कुणीही रोखू शकणार नाही!
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, २९.१.२०२३)