हिंदूंच्‍या व्‍यापक संघटनासाठी सोलापूर येथे १५ फेब्रुवारीला हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून श्री. बापूसाहेब ढगे, श्री. राजन बुणगे, श्री. हिरालाल तिवारी आणि श्री. सत्‍यनारायण गुर्रम

सोलापूर, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदूंवर होणार्‍या अनेक आघातांना वाचा फोडण्‍यासाठी, हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची मागणी करण्‍यासाठी, तसेच हिंदूंच्‍या व्‍यापक संघटनासाठी १५ फेब्रुवारी या दिवशी जयभवानी प्रशालेचे मैदान, भवानी पेठ, सोलापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सभेत सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्‍य समन्‍वयक श्री. मनोज खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्‍ता संघटक अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. राजन बुणगे यांनी दिली. येथील पत्रकार भवन येथे घेण्‍यात आलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब ढगे, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्‍वस्‍त आणि उद्योजक श्री. सत्‍यनारायण गुर्रम, सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी उपस्‍थित होते. या वेळी श्री. सत्‍यनारायण गुर्रम म्‍हणाले, ‘‘लव्‍ह जिहाद, धर्मांतर, हलाल जिहाद यांसारख्‍या हिंदूंवरील आघातांना वाचा फोडण्‍यासाठी सोलापूर येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा महत्त्वपूर्ण ठरेल.’’

हिंदु आणि अन्‍य धर्मीय यांना असमान वागणूक नको ! – बापूसाहेब ढगे, सामाजिक कार्यकर्ते

सध्‍या भारतात हिंदूंसाठी कायदे आणि अन्‍य धर्मियांना फायदे, अशी असमान वागणूक दिली जात आहे. हिंदूंच्‍या न्‍याय मागण्‍यांसाठी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. धर्माच्‍या आधारे केलेले कार्य नेहमी सिद्धीस जाते. त्‍याप्रमाणे हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून होत असलेले हिंदुत्‍वाचे कार्य सिद्धीस जाणार आहे.