नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे शहरात पुष्कळ प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडत आहे. असे असतांनाही प्रशासन त्याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे.
श्री. विजय भोर, प्रतिनिधी
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या किल्ले गावठाण चौकातही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या विज्ञापनांचे फलक लागलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे तुर्भे, वाशी परिसरातील ए.पी.एम्.सी. मार्केटमध्ये विविध वाणिज्य पतसंस्था कार्यालये आहेत. या पतसंस्थांच्या सभा, त्यांच्या अध्यक्षांची निवड, तसेच वाढदिवस यासाठी शुभेच्छा देणारे अनधिकृत ‘होर्डिंग’ राजरोसपणे कोणतीही अनुमती न घेता लावलेले असतात. राजकीय लोकांच्या होर्डिंगवर कारवाई होत नसल्याचे पाहून नोकर्यांविषयी विज्ञापनांचे पोस्टर, वाणिज्य आस्थापने हे त्यांच्या उत्पादनाची विज्ञापने करतांना दिसतात. विशेष म्हणजे महापालिकेच्या नाकावर टिचून हे ‘होर्डिंग’ दिमाखात झळकत असतांना हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका मुख्यालयातील अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन चौक, पोलीस आयुक्तालयकडे जाणारा चौक, दिवाळी गाव, अग्रोली गाव, नेरूळ अक्षर चौक, गायमुख चौक, सारसोळे बस डेपो, समाधान चौक, एल्.पी. चौक, राजीव गांधी उड्डाणपूल चौक, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, आय.सी.एल्. शाळा चौक, अरेंजा सर्कल, कोपरखैरणे डी मार्ट, ऐरोली सेक्टर ५ चौक, घणसोली या ठिकाणी नियमितपणे वर्षाचे १२ ही मास हमखास अनधिकृत होर्डिंग लागलेली असतात.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे नोंद केल्यास याला आळा बसू शकेल. तसेच संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी यावर गुन्हे नोंद करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद असतांनाही अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगिरे याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहेत.
या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उपायुक्तसह सर्व संबंधितांवरती कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य करदाते करत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल नाईक यांनी सांगितले की, अनधिकृत होर्डिंग प्रकरणी आपण महापालिकेच्या आयुक्तांकडे संबंधित कसुरदार अधिकार्यावर कारवाई करण्याची तक्रार केली आहे.
या प्रकरणी पटनिगिरे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.