देहली-मुंबई द्रुतगती मार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वांत मोठ्या एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. देहली-मुंबई द्रुतगती मार्गावरील राजस्थानमधील दौसाच्या धनावद गावात आयोजित एका कार्यक्रमात या द्रुतगती मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मोदी यांच्या भाषणातील ठळक सूत्रे

१. जेव्हा असे आधुनिक रस्ते बांधले जातात, तेव्हा देशाच्या प्रगतीला गती मिळते. जागतिक संशोधनानुसार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवलेल्या रकमेचा विकासासाठी सकारात्मक लाभ होतो.

२. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आला आहे. ही रक्कम वर्ष २०१४ च्या तुलनेत ५ पट अधिक आहे. राजस्थानला याचा मोठा लाभ होणार आहे.

३. आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आणखी एक बाजू आहे. पायाभूत सुविधांमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांना अनेक सुविधा मिळतात. देहली-दौसा-लालसोट या महामार्गाप्रमाणे जयपूर ते देहली प्रवासाचा वेळ निम्म्याने अल्प होईल.

काँग्रेसचा सैन्याच्या शौर्यावर विश्वास नसल्याने ते सीमेवर रस्ते बांधण्यास घाबरत होते ! – पंतप्रधान मोदी

दौसा (राजस्थान) – काँग्रेसच्या नेतृत्वातील केंद्र सरकार सीमाभागात रस्ते बांधण्यास घाबरत होते. शत्रू आपण बांधलेल्या रस्त्याने देशात येईल, अशी भीती त्यांना वाटत होती. काँग्रेस सरकार आपल्या सैनिकांचे शौर्य आणि धाडस यांना का कमी लेखत होते, हे मला कळत नाही. सीमेवर शत्रूला रोखणे आणि त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणे आपल्या सैन्याला चांगलेच ठावूक आहे, असे परखड विधान नरेंद्र मोदी यांनी ‘देहली-मुंबई एक्सप्रेस-वे’च्या उद्घाटनानंतर येथे आयोजित सभेच्या वेळी केले.