वागातोर येथील ‘ग्लोरी क्लब’च्या विरोधात ध्वनीप्रदूषणावरून गुन्हा नोंद

पणजी – हणजूण पोलिसांनी ध्वनीप्रदूषणावरून वागातोर येथील ‘ग्लोरी क्लब’च्या प्रशासकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. २ फेब्रुवारीला रात्री ९.२३ वाजता ध्वनीप्रदूषणाचा प्रकार घडला. हणजूण पोलिसांनी मागील एका मासात ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तिसर्‍यांदा कारवाई केली आहे.


हणजूण-आश्वे-वागातोर येथे सातत्याने ध्वनीप्रदूषण ! – स्थानिकांची तक्रार

हणजूण-आश्वे-वागातोर या समुद्रकिनारपट्टीवरील ‘नाईट क्लब’ आणि समुद्रकिनार्‍यावरील उपहारगृहे न्यायालयाच्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करतात. रात्री चालू झालेल्या पार्ट्या दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत चालू असतात, तसेच तेथे ध्वनीची तीव्रता नियमापेक्षा अधिक म्हणजे ८७ ते ९० डेसिबल इतकी असते. यामुळे समुद्रकिनारपट्टीवरील शांतता भंग पावली आहे. विद्यार्थीवर्ग, ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांना रात्री शांततेने झोप मिळण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे. ही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील एका तक्रारीत नमूद केली आहे.