बेतुल किल्ल्याचे (गडाचे) संवर्धन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा ! – केपेचे काँग्रेसचे आमदार आल्टन डिकोस्ता

फातर्पा – ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. गोवा सरकारने बेतुल येथील किल्ल्याचे तातडीने संवर्धन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा. बेतुल येथील गड सीमाशुल्क विभागाकडून मुक्त करावा. हा गड वर्ष १६७९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांधला गेला होता. नंतर गोवा मुक्त होईपर्यंत तो पोर्तुगिजांच्या कह्यात होता. या गडावर एक तोफही आहे.

सरकारने हा गड ‘वारसास्थळ’ म्हणून घोषित केला आहे; मात्र किल्ल्याची तातडीने डागडुजी करणे आवश्यक आहे. या किल्ल्यावरून साळ नदी अरबी समुद्राला मिळत असल्याचे विहंगम दृश्य दिसते. या गडाला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्यास येथील पर्यटनालाही चालना मिळेल, असे मत काँग्रेसचे केपेचे आमदार आल्टन डिकोस्ता यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील सातार्‍याचे आमदार तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळेकरीण मंदिराला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि आमदार आल्टन डिकोस्ता हे उपस्थित होते. या वेळी आमदार डिकोस्ता यांनी पत्रकारांकडे बोलतांना ही माहिती दिली.

बेतुल किल्ला – गोवा राज्य