‘बीबीसी’वरील नाहक अप्रसन्नतेपेक्षा खराखुरा माहितीपट बनवणे आवश्यक !

१. ‘बीबीसी’च्या वादग्रस्त माहितीपटावर बंदी घालण्यापेक्षा त्यातील चुका दाखवून देणे आवश्यक !

‘एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवल्याने ‘बीबीसी’विषयी अप्रसन्नता दाखवणे भारतासाठी सन्मानजनक गोष्ट नाही. ती एक जागतिक आणि अतिशय जुनी वृत्तसंस्था आहे. तिच्यावर बंदी घातल्याने या माहितीपटात सांगण्यात आलेल्या चुकीच्या गोष्टी बरोबर असल्याचे सहजपणे सिद्ध होते. हा माहितीपट जगभरात मोठ्या संख्येने लोकांनी पाहिला आहे. तेव्हा ही आपलीच हानी करणारी दुर्बुद्धी ठरेल.

मानक पत्रकारिता किंवा लेखन यांच्यासाठी वृत्त किंवा लेखन यांमध्ये पुराव्यानिशी चूक दाखवून देणे, हा मोठा घाव असतो. त्यामुळे संबंधित लेखक-पत्रकार किंवा वृत्तवाहिनी यांच्या  प्रतिष्ठेला बट्टा लागतो. अलीकडेच शाहीनबाग प्रकरणात चुकीचा अहवाल आणि चित्रात चुकीची ओळख दिल्यामुळे दोन मोठ्या विदेशी संकेतस्थळांना सुधारणा करावी लागली अन्   खंत व्यक्त करावी लागली होती. अशाच प्रकारे आपण बीबीसीच्या माहितीपटातील दोष दाखवून दिले असते, तर तिच्यासारख्या प्रतिष्ठित वृत्तवाहिनीविषयीही हे घडू शकले असते.

२. गुजरात दंगल प्रकरणातील हिंदूंची बाजू जगासमोर आणण्यास राष्ट्रवादी नेत्यांची कुचराई !

प्रा. शंकर शरण

दुसरीकडे २० वर्षे होऊन गेली, तरी दूरदर्शनसारख्या अन्य भारतीय वृत्तवाहिन्यांनी गुजरात प्रकरणात आजपर्यंत खराखुरा माहितीपट का बनवला नाही ? त्यांनी साधी श्वेतपत्रिकाही घोषित केली नाही. एवढेच नाही, तर मधु किश्वर, निकोल एल्फी, मन्मथ देशपांडे यांसारख्या स्वतंत्र पत्रकारांनी कष्टाने जे पुरावे गोळा करून प्रकाशित केले, त्यांनाही प्रसारित किंवा पुरस्कृत करण्यात आले नाही. आमच्या नेत्यांनी हे शोध देश-विदेशात प्रसारित केले असते किंवा त्यांना सन्मान दिला असता, तरी गुजरातविषयी एक पर्यायी माहिती सर्वांसमोर आली असती; परंतु आमच्या संघटनवादी राष्ट्रवादींना त्या निधर्मी (सेक्युलर)-डाव्या चर्चेचाच भाग बनून सन्मानित व्हायचे आहे. परिणामी त्यांनी गुजरात प्रकरणात हिंदूंची बाजू लपवून ठेवून गप्प रहाणे पसंत केले. एखाद्या प्रकरणात तुम्ही ठरवाल, तेच इतरांनीही करावे, ही काय गोष्ट झाली ? अशा बालीश प्रवृत्तीने कोणताही सन्मान मिळत नाही. एवढेच नाही, तर ज्या प्रकारे येथील लोक सामाजिक माध्यमांमध्ये ‘बीबीसी’वर तुटून पडले, ते हेच ‘अल् जजिरा’ किंवा इस्लामी देशांच्या वृत्तसंस्थांविषयी करत नाहीत, जेव्हा तेही भारताविषयी खोट्या आणि प्रक्षोभक गोष्टी पसरवत असतात. असा दुटप्पीपणा किंवा गप्प राहिल्याने आपली काय प्रतिमा बनणार आहे ?

३. दुसर्‍यांना दोष देण्यापेक्षा आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

‘बीबीसी’वर ‘परकीय’, ‘भारतविरोधी’ किंवा ‘गोर्‍या जातीची मानसिकतावाले’ आदी आरोप लावणेही चुकीचे आहे. हे १०० वर्षांपूर्वीच्या भावना आजच्या परिस्थितीला चुकीच्या पद्धतीने चिकटवणे आहे. त्यामुळे सत्य गोष्टही दडवल्या जातात. सर्वप्रथम ‘बीबीसी’ने जे काही म्हटले असेल, ते आपल्याच देशाचे शेकडो पत्रकार, लेखक आणि नेतेही म्हणत आले आहेत. भलेही त्यात राजकारण किंवा वैचारिक मतभेद असतील ! दुसरे ‘बीबीसी’ला ‘भारतविरोधी’ म्हणणेही चुकीचे आहे; कारण ती भारतातीलच मुसलमान आणि निधर्मी डावे यांच्या बाजूने बोलत आली आहे, म्हणजे तिची केवळ भारतीय हिंदू अन् कथित हिंदुत्वनिष्ठ यांच्याविषयी चुकीची धारणा आहे. ब्रिटीश संस्थांवर ‘परकीय मानसिकतेचे’ आरोप लावल्याने वाग्वीरांना जे आत्मसुख मिळते, त्याने त्यांच्या शत्रूंची कोणतीही हानी होत नाही. जोपर्यंत देशी-विदेशी हिंदुद्रोह्यांना योग्य नावाने संबोधले जात नाही, तोपर्यंत खरी समस्या तशीच राहील.

वास्तविक स्थिती अधिक बिकट आहे. भारतात अनेक दशकांपासून हिंदु समाजावर खोटे आरोप करणे आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणे या गोष्टी चालू आहेत. कोणत्याही घटनेच्या अपप्रचाराविषयी वास्तव सांगितल्यावरही लक्ष दिले जात नाही. त्याला राजकीयदृष्ट्या धर्मनिरपेक्षता संबोधून योग्य समजले जाते. जर हिंदू किंवा आपल्याला अधिक हुशार समजणार्‍या राष्ट्रवादी पक्षाकडूनही खोट्या आरोपांचा आधार घेतला जात असेल, तर त्या खोट्याच्या चिंधड्या चिंधड्या करून सगळीकडे चेष्टा केली जाईल. आमच्या राष्ट्रवादी लोकांना वाटते की, संख्या आणि सत्ता यांच्या बळावर तेही खोट्या प्रचाराने लाभ उठवू शकतील किंवा विरोधकांवर दबाव आणू शकतील. त्यामुळे तेही मनमानी आरोप आणि खोट्या अवडंबराचा आधार घेतात. ते हे विसरतात की, जगात ज्या सुविधा इस्लामी आणि डावे यांना मिळाल्या आहेत, त्या यांना मिळालेल्या नाहीत. आपल्याला सन्मान मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याऐवजी ते विविध नाटके, अवडंबर आणि धनसत्ता यांच्या दुरुपयोगावर विश्वास ठेवतात. ते परत परत मार खाऊनही काही शिकत नाहीत. हा आपला मूर्खपणा आहे. बाहेरील लोकांना दोष देणे आणि छाती बडवणे चुकीचे आहे. वैचारिक युद्ध जिंकण्याचा योग्य प्रयत्न करण्याऐवजी दुसर्‍यांना डिवचत रहाणे, ही शूद्र वृत्ती आहे. त्यामुळे डावे किंवा परकियांच्या चुकीच्या गोष्टींनाच उलट प्रतिष्ठा मिळते.

‘बीबीसी’ला ‘गोरे’, ‘ख्रिस्ती’, ‘नक्षलवादी’ आदी संबोधून दोषी ठरवण्याचा प्रयत्न यासाठी अयशस्वी राहील; कारण त्यांनी असाच प्रयत्न ट्रंप, पुतिन, ओबामा आदींसाठीही केला आहे आणि ही सर्व मंडळी गोरे ख्रिस्तीच आहेत. तसेच जुन्या युगातील आरोप आज लावण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे आपलीच मानहानी अणि पराभव निश्चित करणे आहे; कारण ‘बीबीसी’चा माहितीस्रोत किंवा पत्रकार हे स्वत: भारताचेच प्रतिष्ठित हिंदु, मुसलमान आणि डावे आहेत. त्यामुळेच ‘बीबीसी’वर ‘नक्षलवादी’, ‘परकीय’ आदी आरोप करणे चुकीचे आहे.

४. सत्य आणि वास्तववादी पुरावे यांद्वारे शत्रूला वैचारिक युद्धात पराभूत करणे शक्य !

असे कृत्रिम दोषारोप करून सटकणे हिंदूंसाठी विशेष लाजिरवाणे आहे; कारण त्यांचे  धर्मशिक्षण सत्यावर दृढ रहाणे शिकवते. ते सोडून छाती बडवणे अत्यंत दु:खद आहे. गुजरात किंवा काश्मीर येथे जे काही घडले, त्याचे वास्तव सांगून जगातील लोकांची थोडीतरी सहानुभूती मिळण्याची शक्यता होती. ते सोडून बालीश कुटनीती हिंदूंची अधिकच दुर्गती करते.

खरी लढाई वैचारिक आहे, जी भारताच्या आत आणि बाहेर एकच आहे. त्यापासून लांब जाऊन बनावट गोष्टींनी जिंकण्याचा प्रयत्न करणे दयनीय आहे. संघटनवादी राष्ट्रवादींनी अयोध्या आंदोलनातूनही धडा घेतला नाही. त्यातही ते अनेक वर्षे इस्लामविषयी खोट्या गोष्टी सांगून मुसलमानांची बाजू जिंकवण्यासाठी अयशस्वी प्रयत्न करत राहिले. त्यासाठी मथुरा आणि काशी यांना स्वत:च्या मनाने सोडून ‘केवळ एक स्थान द्या’, अशी दयनीय उदारता दाखवून स्वत: खुश होत राहिले. शेवटी पू. सीताराम गोयल, अरुण शौरी, कूनराड एल्स्ट आणि ‘व्हॉईस ऑफ इंडिया स्कूल’चे विद्वान यांच्या सत्यनिष्ठ प्रयत्नांनाच यश मिळाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ शोध-पुरावे यांच्या आधारेच अयोध्येच्या वादग्रस्त स्थळावर हिंदूंचा अधिकार मान्य केला, जो परत सर्वाेच्च न्यायालयाने पक्का केला.

५. ‘बीबीसी’ला दोष देण्यापेक्षा सत्तेसाठी हपापलेल्या भारतीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक !

हीच स्थिती अशा प्रत्येक प्रकरणात आहे, जेथे हिंदुहित आणि इस्लामी मनोवृत्ती दिसून पडते. संघटनवादी राष्ट्रवादी मनातल्या मनात सोप्या उपायांसाठी एखादी गोष्ट करत असतात. ज्याची मोठी शिक्षा भौतिक हानी आणि अपमान यांच्या रूपांत हिंदु समाजाला भोगावी लागते; परंतु संघटन अन् सत्ता यांच्या अहंकारात बुडालेले नेते हिंदु समाजाच्या हिताला सहजपणे संकटात टाकत असतात. ते गुजरातपासून काश्मीर आणि पाकिस्तानपासून बांगलादेश अन् अरबी देश यांमध्ये हिंदूंची दुर्दशा किंवा अपमानजनक स्थिती यांवर शब्द उच्चारतही नाहीत. तेव्हा बाहेरच्या लोकांना काय म्हणणार की, ज्यांना एकेरी किंवा चुकीची माहिती आमच्याच देशाचे लोक देत असतात ? विटंबना ही आहे की, तेच नेते अशी माहिती देणार्‍यांना परत परत राष्ट्रीय पुरस्कारांनी पुरस्कृत करत असतात. मधु किश्वर यांच्याऐवजी कुलदीप नायर यांना, पू. सीताराम गोयल यांच्याऐवजी मौलाना वहीदुद्दीन यांना डोक्यावर बसवतात; परंतु लक्षात ठेवा, ‘बीबीसी’ सारख्या परकीय संस्था गुजरात किंवा काश्मीर यांवर अशाच गोष्टी प्रसारित करतात, ज्या देशी कुलदीप नायरच्या असतात. मग वाईट कशाचे वाटून घ्यायचे ?’

– प्रा. शंकर शरण, राजकारणशास्त्राचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ स्तंभलेखक, देहली. (३१.१.२०२३)