कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव पुतळ्याची चोरी !

नवी देहली – अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन जोस उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हा पुतळा चक्क कापून चोरी करण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. महाराजांचा पुतळा पुण्यातून भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये नाराजी पसरली असून शिवप्रेमींनी दु:ख व्यक्त केले आहे.

सॅन जोस पार्क विभागाने यासंबंधी ट्वीट करून माहिती देतांना सांगितले की, उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. हे कळवतांना आम्हाला अत्यंत खेद होत आहे; मात्र हा पुतळा कधी चोरीला गेला ? याविषयी अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही. आम्ही पुतळ्याचा शोध घेत असून शक्य तितक्या लवकर पुतळा शोधू.