तुर्कीयेमध्ये कडाक्याची थंडी आणि विजेचा अभाव यांमुळे साहाय्यताकार्यात अडथळा !

अंकारा (तुर्कस्थान) – तुर्कीये आणि सीरिया देशांतील भूकंपामध्ये आतापर्यंत ८ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पडलेल्या इमारतींच्या ढिगार्‍याखाली सहस्रो लोक अडकल्याची शक्यता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत रहाणार असल्याचे सांगितले जात आहे. विविध देशांकडून भूकंपग्रस्त भागांत साहाय्यताकार्य चालू आहे. भारताचेही पथक तेथे पोचलेले आहे. या पार्श्वभूमीवर तेथील वातावरण प्रतिकूल बनू लागले आहे. वाईट हवामान आणि कडाक्याची थंडी यांमुळे साहाय्यता कार्य करण्यात अडचणी निर्माण हेत आहेत.

सहस्रो लोकांची घरे भूकंपामुळे पडल्यामुळे ते बेघर झाले आहेत. त्यातच थंडी वाढल्यामुळे त्यांना उघड्यावर रहाणे आणि जगणे अवघड झाले आहे. अनेक भूकंपग्रस्त ठिकाणे अशी आहेत, जिथे वीज आणि तेल उपलब्ध नाही. राष्ट्रपती तईप एर्दोगन म्हणाले की, वाईट हवामान हे बचाव मोहिमांसमोरचे मोठे संकट आहे. कडाक्याची थंडी असली, तरी लोक साहाय्यासाठी पुढे येत आहेत.