भाजपच्या महिला नेत्या असणार्‍या अधिवक्त्या लक्ष्मण चंद्रा व्हिक्टोरिया गौरी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती

नियुक्तीच्या विरोधातील याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !  

अधिवक्त्या लक्ष्मण चंद्रा व्हिक्टोरिया गौरी

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने अधिवक्त्या लक्ष्मण चंद्रा व्हिक्टोरिया गौरी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्याच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. ‘गौरी भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस आहेत. त्यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती केल्यास न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. त्यांनी इस्लामचा उल्लेख ‘हिरवा आतंकवाद’ आणि ख्रिस्ती समुदायाचा उल्लेख ‘पांढरा आतंकवाद’ म्हणून केला होता. आमचा या विधानांवर आक्षेप आहे’, असा दावा मद्रास उच्च न्यायालयाच्या २२ अधिवक्त्यांच्या एका समुहाने केला होता. त्यावर सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले, ‘यापूर्वीही राजकीय पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तींची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.’ केवळ २२ मिनिटांपर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. विशेष म्हणजे सुनावणी चालू असतांना मद्रास उच्च न्यायालयात अधिवक्त्या लक्ष्मण चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांचा शपथविधी झाला.

सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती बी.आर्. गवई म्हणाले की, न्यायमूर्ती होण्यापूर्वी माझीही राजकीय पार्श्वभूमी होती. मी २० वर्षांपासून न्यायाधीश आहे; पण मी कधीही माझी राजकीय पार्श्वभूमी माझ्या कर्तव्याच्या आड येऊ दिली नाही.