मध्यपूर्वेतील ४ देशांमध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप : १९०० लोकांचा मृत्यू

नवी देहली – मध्यपूर्वेतील तुर्कीये, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल या देशांमध्ये ६ फेब्रवारीला सकाळी ७.८ तीव्रतेचा भूकंप झाल्याने १९०० लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक घायाळ झाले आहेत. ‘युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे’च्या माहितीनुसार तुर्कीयेमध्ये मृतांची संख्या १ सहस्रांवर पोचली असून ती १० सहस्रांपर्यंत पोचू शकते. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्कीये आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक हानी झाली. तुर्कीयेमध्ये आतापर्यंत २८४ जणांचा मृत्यू झाला, तर ४४० जण घायाळ झाले. सीरियामध्ये २३७ लोक ठार झाले, तर ६३९ घायाळ झाले. लेबनॉन आणि इस्रायल येथे भूकंपाचे धक्के जाणवले; परंतु येथे कोणताही हानी झाली नाही. वर्ष १९३९ मध्ये तुर्कीयेमध्ये ७.८ रिक्टर स्केलचा भूकंप झाला होता. तेव्हा ३० सहस्र लोकांचा मृत्यू झाला होता.

अंकारा, गझियानटेप, कहरामनमारा, दियारबाकीर, मालत्या, नुरदगी शहरासह १० शहरांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या शहरांतील २५० हून अधिक इमारती कोसळल्याचे वृत्त आहे. अनेक लोक ढिगार्‍याखाली गाडले गेले आहेत. लोकांना वाचवण्याचे कार्य चालू आहे. अनेक भागांत आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भूकंपाविषयी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत तुर्कीयेतील लोकांच्या समवेत उभा आहे आणि या संकटावर मात करण्यासाठी शक्य तितके साहाय्य करण्यास आम्ही सिद्ध आहोत.

भारत सरकार ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दला’चे १०० कर्मचारी आणि वैद्यकीय पथक तुर्कीयेमध्ये पाठवणार आहे.

संशोधकाने २ दिवस आधीच दिलेली भूकंपाची चेतावणी !

एस्.एस्.जी.इ.ओ.एस् (ssgeos) या संस्थेमध्ये काम करत असलेले संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी भूकंपाच्या धक्क्याविषयी ट्वीट केले होते.

‘‘येणार्‍या काळात दक्षिण-मध्य तुर्कीये जॉर्डन, सिरिया, लेबेनॉन या भागांत ७.५ रिक्टर स्केल इतक्या भूकंपाचा तीव्र धक्का बसणार आहे’’, असे ट्वीट फ्रँक हूगरबीट्स यांनी केले होते. या ट्वीटसमवेत भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवणारा मॅपही त्यांनी शेअर केला होता.