कोल्‍हापूर येथून सुटणार्‍या दोन पॅसेंजर रेल्‍वेगाड्या २ मार्चपर्यंत रहित

कोल्‍हापूर – मिरज-पुणे मार्गावर कोरेगाव ते सातारा या दरम्‍यान दुहेरीकरणाचे काम चालू आहे. त्‍यामुळे कोल्‍हापूर-पुणे आणि कोल्‍हापूर-सातारा या दोन पॅसेंजर रेल्‍वे २ मार्चपर्यंत रहित करण्‍यात आल्‍या आहेत. या दोन्‍ही गाड्या नोकरदार, विद्यार्थी, व्‍यापारी, तसेच सर्वसामान्‍य नागरिक यांच्‍यासाठी महत्त्वाच्‍या आहेत. या गाड्या रहित झाल्‍याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्‍सप्रेस, महाराष्‍ट्र एक्‍सप्रेस, तसेच कोल्‍हापूर-कलबुर्गी एक्‍सप्रेस याच गाड्या उपलब्‍ध आहेत. याचसमवेत कोल्‍हापूर-हरिप्रिया ही रेल्‍वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्‍कळ हाल होणार आहेत. तरी अनेक प्रवासी संघटनांनी या पॅसेंजर गाड्या किमान मिरज किंवा कराड येथपर्यंत सोडाव्‍यात, अशी मागणी केली आहे.

मिरज-लोंढा मार्गावरील पॅसेंजर गाड्याही १३ फेब्रुवारीपर्यंत रहित !

मिरज-लोंढा मार्गावर घटप्रभा, गोकाक रोडदरम्‍यान रेल्‍वे मार्गाच्‍या दुहेरीकरणासाठी मिरज-हुबळी, मिरज-कॅसरलॉक पॅसेंजर रेल्‍वे १३ फेब्रुवारीपर्यंत रहित करण्‍यात आल्‍या आहेत. याचसमवेत अजमेर-म्‍हैसूर, बेंगळुरू-अजमेर, जोधपूर-बेंगळुरू, निजामुद्दीन-म्‍हैसूर, गांधीधाम-बेंगळुरू या रेल्‍वे गाड्या मिरजेतून पंढरपूर, सोलापूर, होटगीमार्गे वळवण्‍यात आल्‍या आहेत. एर्नाकुलम्-पुणे एक्‍सप्रेस ६ फेब्रुवारीला पनवेलमार्गे पुण्‍याच्‍या दिशेने धावेल. ही गाडी मिरज येथून जाणार नाही. हजरत निजामुद्दीन-म्‍हैसूर स्‍वर्णजयंती एक्‍सप्रेस ६ फेब्रुवारीला दौंड, सोलापूर, होटगी, गदगमार्गे धावेल. ही गाडी पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज येथे येणार नाही. याशिवाय अन्‍य गाड्यांचे मार्गही वळवण्‍यात आले आहेत.