कळंबा (जिल्‍हा कोल्‍हापूर) कारागृहात बंदीवानाने केलेल्‍या आक्रमणात दुसर्‍या बंदीवानाचा मृत्‍यू !

कोल्‍हापूर – कोल्‍हापुरातील कळंबा मध्‍यवर्ती कारागृहात संशयित आरोपी गणेश लक्ष्मण गायकवाड याने केलेल्‍या आक्रमणात सतपालसिंह जोगेंद्रसिंह कोठडा या बंदीवानाचा मृत्‍यू झाला आहे. गणेश गायकवाड याने सतपालसिंह याच्‍या डोक्‍यात मध्‍यरात्री दगड घातल्‍याने तो गंभीर घायाळ झाला होता. त्‍याला शासकीय रुग्‍णालयात उपचारांसाठी भरती करण्‍यात आले होते; मात्र त्‍याचा उपचाराच्‍या कालावधीत मृत्‍यू झाला. गणेश गायकवाड यांच्‍यावर हत्‍येचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. गतवर्षी मकोका कारवाईखाली अटकेत असलेल्‍या बंदीवानाने कळंबा कारागृहात आत्‍महत्‍या केल्‍याने खळबळ उडाली होती. कळंबा कारागृहात हाणामारी, भ्रमणभाष सापडणे, कारागृह अधिकार्‍यांवर लैंगिक अत्‍याचारांचे आरोप, बंदीवानांकडे गांजा सापडणे अशा घटनांमुळे तेथील सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.