अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हादईच्या संदर्भात गोव्याच्या बाजूने ठराव पारित

वर्धा – येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीच्या संदर्भात गोव्याच्या बाजूने ठराव पारित झाला आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक रमेश वंसकर यांनी हा ठराव मांडला आणि राजमोहन शेट्ये यांनी त्याला अनुमोदन दिले. याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, ‘‘या ठरावाचे गोवा सरकारच्या वतीने मी स्वागत करतो. अखिल भारतीय स्थरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने पारित झालेल्या या ठरावामुळे म्हादईसाठी चालू असलेल्या लढ्यात आमचे बळ वाढले आहे.’’

युरी आलेमाव यांचा केंद्रीय पर्यावरणमंत्री यादव यांना प्रश्न : वैज्ञानिक अभ्यासाविनाच कर्नाटकला अनुमती दिली का ?

पणजी, ५ फेब्रुवारी – कळसा-भंडुरा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवालाला (‘डीपीआर्’ला) वैज्ञानिक अभ्यास अहवालाविना संमती देण्यात आली होती का ? असा प्रशन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ५ फेब्रुवारीला केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना विचारला आहे. पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी ४ फेब्रुवारीला एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ‘म्हादई नदीचे पाणी वळवण्यास अनुमती दिल्याविषयी पर्यावरणमंत्री या नात्याने आपले मत काय ?’, असा प्रश्न विचारला होता. यावर यादव यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आणि ‘जेव्हा हा प्रश्न केंद्रीय पर्यावरण आणि वन खात्यांकडे येईल, तेव्हा अभ्यास करून निर्णय घेऊ’, असे म्हटले होते. त्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘पर्यावरण,वन आणि हवामान खाते किंवा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे स्पष्ट करतील का की, शास्त्रीय अभ्यासाविना कळसा भंडुरा प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल कसा संमत झाला? त्याचप्रमाणे गोव्यावर मुरगाव बंदरात कोळसा हाताळण्याची क्षमता वाढवणे, दुहेरी रेल्वेमार्ग आणि अभयारण्यातून जाणारी वीजवाहिनी हे ३ विनाशकारी प्रकल्प लादतांना वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला होता का ?’’

म्हादई वळवण्याला आणि कोळसा वाहतुकीला विरोध करण्याचा वेल्साव ग्रामसभेचा ठराव

पणजी – वेल्साव-असोर्शी-पाले पंचायतीच्या ग्रामसभेत ५ फेब्रुवारीला कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यास विरोध करण्याचा ठराव संमत केला. ट्रक क्षमतेहून अधिक भरला जात असल्याने रस्त्याने कोळसा वाहतूक बंद करण्याचा ठरावही ग्रामसभेने संमत केला. कोळसा वाहून नेणार्‍या गाड्या जोरात वाजणार्‍या ‘हॉर्न’सह धावतात. त्यामुळे गावकर्‍यांना त्रास होतो, असे आणखी एका ठरावात म्हटले आहे.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा