केंद्रशासनाच्या अहवालानुसार ३११ प्रदूषित नद्यांच्या सूचीमध्ये गोव्यातील ६ नद्या

उद्योग आणि कारखाने यांच्याकडून टाकाऊ पदार्थ नद्यांमध्ये सोडले गेल्याने नद्या प्रदूषित !

कारखान्यांकडून गाळ नदीत सोडला जातो

पणजी, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – केंद्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार देशभरातील ३११ नद्यांचे पाणी प्रदूषित झाले असून त्या सूचीमध्ये गोव्यातील ६ नद्यांचा समावेश आहे. या ६ नद्यांमध्ये बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बी.ओ.डी.) हे ३ पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या नद्यांमधून प्रदूषण अधिक प्रमाणात होते, असे केंद्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.

केंद्रशासनाकडून प्रसिद्ध केलेल्या या अहवालाविषयी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, ‘‘या विषयीच्या सविस्तर अहवालामध्ये म्हटले आहे की, औद्योगिक वसाहतीमधील काही आस्थापने, कारखाने इत्यादींकडून टाकाऊ पदार्थ या नद्यांमध्ये सोडले जातात. नद्या प्रदूषित होण्याचे हेच मुख्य कारण आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचू नये, यासाठी नद्या स्वच्छ करण्याविषयीची मोहीम केंद्रशासनाने चालू केली आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक प्रावधान करण्यात आले आहे. नद्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी राज्यशासनाने त्वरित कृती करावी.’’

गोव्यात काही कारखान्यांकडून उरलेला गाळ नदीत सोडला जातो, तसेच नद्यांच्या काठावर रहाणारे नागरिकही नदीमध्ये कचरा टाकतात आणि गटाराचे पाणी सोडतात. यासंबंधी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याविषयीच्या सूचना गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या आहेत.

संपादकीय भूमिका

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची आवई उठवणारे तथाकथित पर्यावरणवादी उद्योग आणि कारखाने यांच्याकडून टाकाऊ पदार्थ नद्यांमध्ये सोडले जात असतांना गप्प का ?