ग्रामदेवतेच्या मंदिराजवळील मद्यालयाला जिल्हाधिकार्‍यांनी अनुमती नाकारली !

कोतवडे (जिल्हा रत्नागिरी) येथील ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा परिणाम

मद्यालयाच्या विरोधात ग्रामस्थांची स्वाक्षरी मोहीम !

रत्नागिरी, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – ग्रामस्थ आणि भाविक यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळील ‘ऋषिकेश बिअर शॉपी’ची अनुमती जिल्हाधिकार्‍यांनी नाकारली.

गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ असलेल्या मद्यालयाला अनुमती नाकारावी, अशी मागणी केली. यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. कोतवडे गावातील विविध वाड्यांमधील ग्रामस्थांनी स्वाक्षरीची मोहीम राबवून मद्यालयाच्या विरोधात कोतवडे ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. ग्रामस्थांनी एकजुटीने दिलेल्या या लढ्याला यश मिळाले असून जिल्हाधिकार्‍यांनी वर्ष २०२२-२३ साठी मद्यालयाचे नूतनीकरण नाकारले आहे, तसेच मंदिराच्या जवळून मद्यालय हटवण्याचा आदेश दिला आहे.

परमिट रूम’होणार तेथील जवळच असलेले ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर

१. ३ फेबु्रवारी या दिवशी जिल्हाधिकार्‍यांनी कोतवडे ग्रामपंचायतीला पत्र पाठवून निर्णयाची माहिती दिली आहे. या मद्यालयाचे मालक अनिल नेवरेकर यांनी त्या ठिकाणी परमिट रूम उघडण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. मंदिरापासून जवळ परमिट रूम झाल्यास मंदिराच्या पावित्र्याला येणारी बाधा लक्षात घेऊन गावणवाडी आणि कोलगेवाडी येथील ग्रामस्थांनी याविरोधात ग्रामपंचायतीकडे तक्रार केली.

२. या मद्यालयामुळे मंदिराच्या परिसरात मद्य पिऊन येणे, मंदिराच्या आवारात मद्याच्या बाटल्या टाकणे असे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांनी तक्रारीमध्ये नमूद केले होते. या मद्यालयामुळे गावातही तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले होते.

कायदा आणि सुव्यवस्था यांच्या प्रश्‍नामुळे अनुमती नाकारली !

हा विषय जनता दरबारामध्ये आल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी मंदिरापासून मद्यालयाचे अंतर मोजण्याचा आदेश उत्पादन शुल्क विभागाला दिला होता. त्यानुसार अंतराची मोजणी केली असता मंदिरापासून मद्यालयाचे अंतर १०२ मीटर मोजले गेले. शासनाच्या नियमानुसार हे अंतर कायदेशीर (७५ मीटरच्या पुढे) होते; मात्र मद्यालयामुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होत असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या बाजूने निर्णय देत परमिट रूम आणि मद्यालय यांना अनुमती नाकारली.

ग्रामस्थांच्या लढ्याला प्रशासनाकडून सहकार्य !

ग्रामदेवीच्या मंदिरापासून मद्यालय हटवण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या कायदेविषयक लढ्याला कोतवडे ग्रामपंचायत, पोलीस, प्रशासन, तसेच स्थानिक आमदार आणि सध्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सहकार्य केले. ग्रामस्थांनी एकजूट दाखवल्यामुळे ग्रामदेवीच्या मंदिराजवळील मद्यालय हटवण्यात यश मिळाले. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने गावणवाडीचे वाडीप्रमुख श्री. रवींद्र गोताड, महात्मा गांधी तटामुक्ती समितीचे सदस्य श्री. दर्शन ठोंबरे, तसेच गावणवाडी ग्रामस्थांशी संपर्क साधला असता सर्व ग्रामस्थांनी ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवीच्या आशीवार्दामुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.

मौजे, कोतवडे ग्रामपंचायत हद्दीतील बिअर शॉपी बंद आदेश

संपादकीय भूमिका 

श्रद्धस्थानाच्या पावित्र्यरक्षणासाठी संघटितपणे आवाज उठवणार्‍या कोतवडेवासियांचा आदर्श समस्त हिंदूंनी समोर ठेवावा !