किमान ४० देश टाकू शकतात ऑलंपिक खेळांवर बहिष्कार ! – पोलंडचे क्रीडामंत्री

वर्ष २०२४ च्या पॅरिस ऑलंपिकवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे काळे ढग !

रशिया आणि बेलारूस देशांच्या खेळाडूंचा सहभाग करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटनेचा विचार !

उजवीकडे पोलंडचे क्रीडामंत्री कामिल बोर्टनिझुक

वॉरसा (पोलंड) – पॅरिस येथे पुढील वर्षी होणार्‍या ऑलंपिक खेळांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. पोलंडचे क्रीडामंत्री कामिल बोर्टनिझुक यांनी धमकावत म्हटले, ‘‘रशिया आणि बेलारूस यांच्या खेळाडूंना एका तटस्थ ध्वजाखालीही खेळू देण्याचा निर्णय झाल्यास किमान ४० देश ऑलंपिकवर बहिष्कार घालतील. यामुळे या खेळांमध्ये काही अर्थच रहाणार नाही !’’

१. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने युरोपीय देश त्याच्या, तसेच बेलारूसच्या खेळाडूंना खेळांमध्ये सहभागी होण्याला विरोध करत आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटना दोन्ही देशांच्या खेळाडूंना एका तटस्थ ध्वजाखाली खेळण्यावर विचार करत असल्याचे समोर आल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटनेच्या या भूमिकेवर पोलंड, लिथुएनिया, इस्टॉनिया आणि लॅटव्हिया यांनी विरोध दर्शवला आहे. युक्रेननेही बहिष्काराचे अस्त्र उगारणार असल्याचे आधीच म्हटले आहे.

२. यावर आंतरराष्ट्रीय ऑलंपिक संघटनेने मात्र ‘हा खेळाडूंवर अन्याय होईल. असा बहिष्कार घालणे, हे संघटनेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे’, अशी भूमिका मांडली आहे.

३. १० फेब्रुवारी या दिवशी संघटनेची बैठक होणार असून त्याआधी ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा यांच्यासह ४० देशांचा या निर्णयाच्या विरोधात गट बनवण्याचा प्रयत्न करू, असे धमकीवजा इशाराही पोलंडच्या क्रीडामंत्र्यांनी दिला आहे.

४. अमेरिकेने मात्र यावर तटस्थ भूमिका घेतली असून म्हटले आहे की, रशिया आणि बेलारूस यांच्या खेळाडूंना खेळण्याची जर अनुमती देण्यात आली, तरी ते कोणत्याच देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, हे स्पष्ट असणे आवश्यक आहे.