इयत्ता दहावी-बारावीची प्रश्‍नपत्रिका भ्रमणभाषवर पाठवल्‍यास ५ वर्षे परीक्षेला मुकणार !

फौजदारी गुन्‍हाही नोंद होणार !

मुंबई – या वर्षी १० वी आणि १२ वीच्‍या परीक्षेचे नियम कडक करण्‍यात आले आहेत. परीक्षेच्‍या प्रश्‍नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्‍नपत्रिका मिळवणे, विकणे आणि विकत घेतल्‍यास किंवा भ्रमणभाषसंच अन्‍य इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्‍यमांवर प्रसारित केल्‍यास परीक्षार्थी विद्यार्थ्‍याची परीक्षा रहित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. विद्यार्थ्‍यास पुढील ५ वर्षांच्‍या परीक्षांना प्रतिबंध करण्‍यात येणार आहे, तसेच परीक्षार्थ्‍याविरुद्ध फौजदारी गुन्‍हाही नोंद करण्‍यात येणार आहे.

इयत्ता १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत, तर इयत्ता १० वीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळाकडून संपूर्ण सिद्धता करण्‍यात आली आहे; मात्र गेल्‍या २ वर्षांत झालेल्‍या परीक्षांच्‍या अनेक नियमांत यंदा पालट करण्‍यात आला आहे. समवेतच कॉपीमुक्‍त परीक्षा घेण्‍यासाठी काही कठोर नियमावलीही घोषित करण्‍यात आली आहे. मागील २ वर्षांत कोरोनाची परिस्‍थिती पहाता माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्‍यांसाठी काही पालट करत सूट देण्‍यात आली होती; मात्र आता या नियमात मंडळाने पालट करून पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका 

  • मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्‍यांवर संस्‍कार नाहीत, असे कुणाला वाटल्‍यास चूक ते काय ? शालेय अभ्‍यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव केला असता, तर यासाठी कडक नियम करण्‍याची वेळ आली नसती !