अल्‍पवयीन मुलांमधील वाढती गुन्‍हेगारी ?

पुण्यात ‘कोयता गँग’ची भीती

पुणे येथे मागील काही दिवसांपासून ‘कोयता गँग’ची भीती पसरली आहे. यामध्‍ये अल्‍पवयीन मुलांचा समावेश अधिक असून या गँगचा प्रसार आता थेट शाळांपर्यंत येऊन पोचला असल्‍याने चिंता व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. २ अल्‍पवयीन मुलांनी भरदिवसा पुण्‍यातील आप्‍पा बळवंत चौक येथे नूतन मराठी विद्यालयात अकरावीमध्‍ये शिकणार्‍या एका १७ वर्षीय विद्यार्थ्‍यावर कोयत्‍याने वार केला. यात तो जखमी झाला. विशेष म्‍हणजे पुणे पोलिसांनी याच कनिष्‍ठ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्‍यांचे समुपदेशन केले होते.

विद्येचे माहेरघर असलेल्‍या पुण्‍यामध्‍ये अल्‍पवयीन मुलांची वाढती गुन्‍हेगारी लज्‍जास्‍पद आहे. शिकण्‍याच्‍या वयात या मुलांच्‍या हातात बंदूक, चाकू, सुरे असणे, हे सध्‍याच्‍या मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचे अपयशच म्‍हणावे लागेल. कोवळ्‍या वयात हाती आलेले भ्रमणभाष, त्‍यावर सहज उपलब्‍ध होणारे अश्‍लील चित्रपट, अनेक हिंसक प्रवृत्तीच्‍या गुन्‍हेगारी विश्‍वाशी संबंधित ‘वेब सिरीज’ आणि पालकांचे आपल्‍या पाल्‍यांकडे होणारे दुर्लक्ष यांसारख्‍या अनेक कारणांमुळे अल्‍पवयीन मुलांच्‍या मानसिकतेवर परिणाम होत आहे. यातून अल्‍पवयीन मुले गुन्‍ह्याच्‍या विळख्‍यात सापडत आहेत, असे मत तज्ञांनी मांडले आहे. यांसह सामाजिक माध्‍यमांचा वाढता वापर, व्‍हॉटसअ‍ॅप गट सिद्ध करणे, आक्षेपार्ह ‘रिल्‍स’ (लहान स्‍वरूपातील व्‍हिडिओ) सिद्ध करणे, तसेच गुंडांचे अनुकरण करणे आदींचे प्रमाण वाढत असून यातून गुन्‍हेगारीला पोषक वातावरण सिद्ध होत आहे. या मुलांना कठोर शिक्षा करता येत नसल्‍याने पोलिसांसाठीही ‘अल्‍पवयीन गुन्‍हेगार’ ही डोकेदुखी झाली आहे.

अल्‍पवयीन मुले गुन्‍हेगार बनण्‍याची कारणे कोणतीही असली, तरी गुन्‍हेगारीचे मूळ असलेली हिंसा, उद्धटपणा किंवा गुन्‍हेगारी प्रवृत्ती रोखण्‍यामध्‍ये सर्वच स्‍तरावर अल्‍प पडत असलेल्‍या प्रशासकीय यंत्रणेचाही यामध्‍ये वाटा आहे. यामध्‍ये सर्वांत महत्त्वाची भूमिका व्‍यक्‍तीच्‍या स्‍वभावामध्‍ये पालट करणे, ही आहे. यामध्‍ये पोलीस समुपदेशन करतात; परंतु तरीही मुलांची गुन्‍हेगारी वृत्ती नष्‍ट होत नाही. यासाठी मुलांना धर्मशिक्षण देऊन त्‍यांच्‍याकडून साधना म्‍हणजेच नामजपादी उपासना करून घेणे महत्त्वाचे आहे. साधना किंवा उपासना केल्‍यावर मनुष्‍याच्‍या वृत्तीत पालट होतो, याचे सर्वोत्तम उदाहरण, हे वाल्‍मीकि ऋषींचे आहे. त्‍यामुळे बालसुधारगृहामध्‍ये मुलांवर नामजपादी साधनेचे अन् धर्मशिक्षणाचे संस्‍कार करणे हाच यावरील अंतिम उपाय आहे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे