सध्या बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांना अंनिसवाल्यांनी ‘चमत्कार सिद्ध करा आणि ३० लाख रुपये मिळवा’, असे आव्हान दिले अन् त्यावर ‘पंडित धीरेंद्रकृष्ण मात्र आव्हान न स्वीकारता पळून गेले’, अशा बातम्या पसरवल्या आहेत. त्या अनुषंगाने उपस्थित होणार्या काही प्रश्नांची उत्तरे अंनिसवाले देतील का ?
ते पुढीलप्रमाणे…
१. प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये कुठेही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी पळ काढल्याचे दिसून येत नाही. केवळ २ दिवस आधी दौरा संपला आणि ते माघारी गेल्याचे दिसून येते. मग ‘ते पळाले’, हे अंनिसवाल्यांनी स्वतःच ठरवले का ?
२. अंनिसने आव्हान देतांना ते ३० लाख कोणत्या बँकेत जमा केले आहेत ? याचा ते काही पुरावा देऊ शकतात का ?
३. जनतेच्या पैशाची मनाप्रमाणे उधळपट्टी करण्याचे कार्यक्रम आखणार्या अंनिससारख्या स्वयंसेवी संस्थेला इतका पैसा कोणत्या माध्यमातून मिळतो ? याची चौकशी व्हायला नको का ?
४. जर जनतेच्या पैशातून अशा प्रकारची आव्हाने दिली जात असतील, तर स्वयंसेवी संस्थांना अशा प्रकारे जनतेचा पैसा उधळण्याचा कायदेशीर अधिकार आहे का ?
५. जी संघटना चमत्कार मानत नाही, तिचेच नास्तिक लोक न्यायाधीश होऊन जर चौकशी करणार असतील, तर अशा आव्हानांचा अर्थ म्हणजे ‘केवळ प्रसिद्धी मिळवणे इतकाच आहे’, असे वाटते.
६. चमत्कार कसा ठरवायचा ? त्याचे प्रमाण काय ? ते ठरवणारे तज्ञ कोणते ? याचा सरकारी पातळीवर काही लेखाजोखा अंनिसवाल्यांनी दिला आहे का ?
७. रेल्वेमध्ये बंगाली बाबांची भित्तीपत्रके (पोस्टर) अनेक दिवस दिसत आहेत, आळंदीत धर्मांतर केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा अनेक घटनांच्या विरोधात अंनिस काय करत आहे ? याची माहिती ते देतील का ?
८. जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असतांना कायद्याच्या आधारे लढण्यापेक्षा अशी फुटकळ आव्हाने देणार्या अंनिसवाल्यांना कायद्यावर विश्वास नाही का ? ‘कायदा श्रेष्ठ कि फुटकळ आव्हान ?’, ते अगोदर ठरवून घ्या.
९. ज्या अर्थी महाराजांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्या अर्थी कायद्यानुसार काहीही चुकीचे घडलेले नाही. नेहमीप्रमाणे अंनिसवाल्यांनी उठवलेली ही अफवा आहे. त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करतांना शहानिशा करून घ्यावी. नाही तर तोंडावर पडायला होते.
१०. आणि हो, ‘राज्यघटना आणि कायद्यानुसार अंनिसवाल्यांनी दिलेली आव्हाने कुणीही स्वीकारलीच पाहिजेत’, असे काही बंधन आहे का ?
११. मुळात सर्वांत महत्त्वाचा एकच प्रश्न ‘कोण ही अंनिस ?’
– श्री. सतिश कोचरेकर, मुंबई (१६.१.२०२३)