‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस’ ठेवून भीमा नदीमध्‍ये वाळू उपसा चालू !

‘वाळू तस्‍करांवर कोणताही अंकुश राहिला नाही’, अशी नागरिकांची प्रतिक्रिया

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर) – भीमा नदीकाठच्‍या एका वाळू तस्‍कराने वाळू उपसा चालू असल्‍याचे छायाचित्र ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस’ला ठेवले आहे. छायाचित्रामध्‍ये यंत्राच्‍या साहाय्‍याने वाळू उपसा चालू असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे. वाळू तस्‍कराच्‍या या कृत्‍याने ‘वाळू तस्‍करांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही’, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्‍यक्‍त केली जात आहे. तस्‍करांच्‍या टोळीच्‍या सदस्‍यावर काही दिवसांपूर्वी गुन्‍हा नोंद झाला आहे. ‘टोळीप्रमुख कारागृहात असूनही वाळूचा उपसा चालूच आहे’, हेच ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस’च्‍या माध्‍यमातून दाखवण्‍याचा प्रयत्न संबंधित वाळू तस्‍कराने केला आहे. पंढरपूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अवैध खडी क्रशर, मुरूम उत्‍खनन आणि वाळू तस्‍करी चालू आहे. (व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस ठेवून वाळू उपसा करण्‍यापर्यंत तस्‍करांची मजल जाते यावरून पोलीस, प्रशासन यांचा कोणताही वचक नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. अशा प्रशासनाकडून कायदा-सुव्‍यवस्‍था कधीतरी राखली जाईल का ? राजरोसपणे चालू असलेला वाळू उपसा प्रशासनाला का दिसत नाही ? – संपादक)