करदात्यांचे ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त !

 • वर्ष २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर

 • ९ वर्षांनंतर प्रथमच कररचनेत पालट !

 • रेल्वेसाठी भरीव तरतूद !

 • महिलांसाठी नवीन बचत योजना !

 • ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजनेतील ठेवींच्या कमाल मर्यादेत वाढ !

 • शेतकर्‍यांसाठी डिजिटल प्रशिक्षणाची, तर भरडधान्य वाढीसाठी ‘श्री अन्न योजने’ची घोषणा !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन् यांनी शेती, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा, रेल्वे अशा विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदी घोषित केल्या. सीतारामन् यांनी सीमाशुल्क आदींमध्ये पालट घोषित केले. विदेशातून आयात होणार्‍या खेळण्यांवरील सीमाशुल्क १३ टक्क्यांनी घटवण्यात आले आहे. गेल्या ९ वर्षांनंतर कररचना पालटण्यात आली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वर्ष २०१४ नंतर यंदाच्या वर्षी आयकर मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे जनतेला ७ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही; मात्र ७ लाखानंतरच्या उत्पन्नावर कर आकारला जाईल. ९ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर ४५ सहस्र रुपयांचा, तर १५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर दीड लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे नवीन करप्रणाली आणतांना जुनी करप्रणालीही चालू ठेवण्यात आली आहे.

७ लाख रुपयानंतरची नवी कररचना                रुपये  कर (टक्के)
०-३ लाख कर नाही
३-६ लाख
६-९ लाख १०
९-१२ लाख १५
१२-१५ लाख २०
१५ लाखांहून अधिक ३०

आयकर भरणे सोपे होणार

आयकर भरण्याची प्रक्रिया करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ वर्ष २०२३-२४ मध्ये ९३ दिवसांवरून १६ दिवसांवर आणण्यात आला आहे. ४५ टक्के आयकर परतावा आवेदनांवर (फॉर्मवर) २४ घंट्यांच्या आत प्रक्रिया करण्यात येणार आहे.

काय महाग होणार ?

 • सोने आणि चांदी यांची विदेशातून आयात केलेली भांडी अन् दागिने
 • प्लॅॅटिनमचे दागिने
 • विदेशी किचन चिमणी
 • ठराविक ब्रँड्सच्या सिगारेट
 • छत्री
 • क्ष-किरण यंत्र (एक्स रे मशीन)
 • हिरे

काय स्वस्त होणार ?

 • भ्रमणभाष संच
 • टी.व्ही.चे सुटे भाग
 • इलेक्ट्रिक कार
 • लिथियम आयर्न बॅटरी
 • विदेशातून आयात होणारी खेळणी
 • सायकल
 • बायोगॅस संबंधी उपकरणे
 • एल्ईडी टीव्ही
 • मोबाईल कॅमेरा लेन्स
 • हिर्‍यांचे दागिने
 • कपडे

भारतीय रेल्वेसाठी १०० योजना राबवणार !

यंदाच्या अर्थसंकल्पात आगामी वर्षात रेल्वेसाठी २ लाख ४० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेचे नवे मार्ग आणि नवे प्रकल्प यांना गती देण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या १०० महत्त्वाच्या योजना प्राधान्याने राबवल्या जाणार आहेत. यात रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यावर भर दिला जाणार आहे. रेल्वेसाठी डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.

सौजन्य: PIB India

अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

 • आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ७० सहस्र ‘एकलव्य मॉडेल स्कूल’ प्रारंभ करणार
 • पुढील ३ वर्षात ३८ सहस्र शिक्षकांची भरती करणार
 • देशभरात ५७ नवीन ‘नर्सिंग कॉलेज’ स्थापन करणार
 • कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या) वापरावर भर देणार.
 • प्रादेशिक भाषांचा अधिक वापर करणार
 • डिजिटल ग्रंथालयांची संख्या वाढवणार
 • ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजने’ची मर्यादा साडेचार लाखांवरून ९ लाख रुपये करणार
 • संयुक्त खात्यात कमाल रक्कम जमा करण्याच्या मर्यादेत १५ लाख रुपयांपर्यंत वाढ करणार
 • महिलांसाठी २ वर्षांसाठी नवीन बचत योजना. महिला २ लाख रुपयांपर्यंतची ‘महिला सन्मान बचत पत्रे खरेदी करू शकतात. यावर वार्षिक ७.५ टक्के दराने व्याज देणार
 • देशात ५० अतिरिक्त विमानतळ चालू करणार
 • शेतकर्‍यांसाठी डिजिटल प्रशिक्षण चालू करणार
 • भरडधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू आदी धान्य) वाढवण्यासाठी ‘श्री अन्न योजना’ चालू करणार
 • कृषी क्षेत्रासाठी भांडार क्षमता वाढवणार. यासाठी ‘इंडियन मिलेट्स इन्स्टिट्यूट’ची स्थापना करणार
 • सर्व अंत्योदय योजनेच्या लाभधारकांना आणि प्राधान्य कुटुंबांना पुढील एक वर्षासाठी विनामूल्य धान्य देणार