संतांविषयी कुणी चुकीचे बोलू नये, यासाठी कायदा करा – देहू संस्‍थानचे विश्‍वस्‍त माणिक महाराज मोरे यांची मागणी

पुणे – बागेश्‍वर धाम पिठाचे पिठाधीश्‍वर धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्री महाराज म्‍हणजेच बागेश्‍वर बाबा सध्‍या त्‍यांनी केलेल्‍या विधानामुळे चर्चेत आहेत. संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराज यांच्‍या संदर्भात त्‍यांनी केलेल्‍या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. ‘संत तुकाराम महाराज महाराष्‍ट्राचे असे महात्‍मा होते, ज्‍यांची पत्नी त्‍यांना प्रतिदिन काठीने मारत होती. या संदर्भात प्रश्‍न विचारल्‍यावर’ मारणारी पत्नी मिळाल्‍यामुळे मी देवावर प्रेम करू शकलो’ अशा आशयाचा व्‍हिडिओ सध्‍या प्रसारमाध्‍यमांवर प्रसारित होत आहे. यावर देहू संस्‍थांचे विश्‍वस्‍त माणिक महाराज मोरे यांनी ‘संतांच्‍या संदर्भात चुकीचे वक्‍तव्‍य करू नका. सविस्‍तर माहिती घ्‍या आणि मगच बोला. वारकरी संप्रदाय सहिष्‍णु आहे. त्‍यामुळे मी त्‍यांना (बागेश्‍वर बाबा) क्षमा करतो; मात्र संतांवर कुणी काही बोलू नये यासाठी कायदा करावा. जेणेकरून अशा गोष्‍टींना पायबंद बसेल’, असे सांगितले. ‘धीरेंद्र शास्‍त्री यांनी जगद़्‍गुरु तुकाराम महाराज यांच्‍या संदर्भात चुकीचा संदर्भ दिला आहे. त्‍यामुळे केवळ वारकरी संप्रदायाचा नाही, तर संपूर्ण महाराष्‍ट्राचा अपमान झाला आहे. त्‍यांनी लवकरात लवकर जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांची क्षमा मागावी’, अशी मागणी भाजपचे आध्‍यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका 

सध्‍या कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, संस्‍कृती, संत, परंपरा यांच्‍यावर वाटेल ते बोलतो. हिंदु संघटित नसल्‍यामुळेच असे होत आहे. सर्वत्रच्‍या हिंदूंनी संघटित होऊन आपली ताकद दाखवल्‍यास कुणाचेही असे वक्‍तव्‍य करण्‍याचे धाडस होणार नाही.