पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर), २७ जानेवारी (वार्ता.) – विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावर परत अतिक्रमण होता कामा नये, अशी शिवभक्तांची तीव्र भावना आहे. गड अतिक्रमणमुक्त होत असतांना, तसेच त्याचे संवर्धन होतांना त्यावरील वास्तू पुरातन काळात जशा होत्या तशाच त्या जतन झाल्या पाहिजेत, असे मत ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी मांडले. विशाळगड येथील अतिक्रमण, तसेच तेथील ऐतिहासिक स्थळांची झालेली दुरवस्था या संदर्भात आमदार श्री. विनय कोरे यांनी पन्हाळा येथे एका बैठकीचे आयोजन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगराध्यक्ष श्री. विजय पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, सर्वश्री हर्षल सुर्वे, सुखदेव गिरी, दिलीप देसाई, किशोर घाटगे, राम यादव, अमित अडसूळ, संभाजी (बंडा) साळुंखे, अधिवक्ता राजेंद्र पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि शिवभक्त उपस्थित होते. या प्रसंगी शिवदुर्ग संवर्धनचे श्री. हर्षल सुर्वे यांनी गडावर छत्रपती शिवरायांचे भव्य शिल्प उभारणीची मागणी केली, तर श्री. सुखदेव गिरी यांनी विशाळगडावरील पुरातन फरसबंदी मार्ग, मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
बैठकीतील उपस्थित प्रमुखांकडून माहिती घेतल्यानंतर आमदार श्री. विनय कोरे यांनी गडावरील कोणत्याही ऐतिहासिक स्थळांना धक्का न लावता त्याचे संवर्धन करताना निधी अल्प पडू देणार नाही, शिवभक्तांकडून येणार्या सूचना डोळ्यांसमोर ठेवूनच विशाळगडाचा विकास केला जाईल, असे सांगितले.