पुणे, २६ जानेवारी (वार्ता.) – येथील श्री दशभुजा गणपति मंदिरासमोर, महर्षि कर्वेनगर रस्ता, एरंडवणा येथे दुपारी ४.३० वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २४ जानेवारी या दिवशी आंदोलन करण्यात आले. कर्नाटकातील वादग्रस्त प्राध्यापक के.एस्. भगवान यांनी भगवान श्रीरामाविषयी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यापूर्वीही प्रा. भगवान यांनी अशीच विधाने केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. ‘पुन्हा अशी आक्षेपार्ह विधाने करणार नाही’, या अटीवर त्यांना जामीन मिळाला होता; पण या अटीचा भंग केल्याने त्यांचा जामीन रहित करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर आणि उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी. हिंदूंच्या देवतांचा होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर ईशनिंदाविरोधी कायदा करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
‘भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी या वेळी दिली. या वेळी प्रा. विठ्ठल जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डहाणूकर कॉलनीतील राममंदिराचे श्री. शाम देशपांडे, तसेच पुष्कळ हिंदुत्वनिष्ठ या आंदोलनाला उपस्थित होते.