रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री सिद्धिविनायक मूर्तीच्‍या प्रतिष्‍ठापना सोहळ्‍याच्‍या वेळी पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

आज माघ शुक्‍ल चतुर्थी  म्‍हणजेच श्री गणेश जयंती आहे, त्‍या निमित्ताने…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीचा प्राणप्रतिष्‍ठापनेचा सोहळा झाला. त्‍या वेळी सनातनच्‍या पाठशाळेतील पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आगमन झालेली श्री सिद्धीविनायकाची मूर्ती

१. श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीच्‍या प्रतिष्‍ठापनेच्‍या पहिल्‍या दिवशी वातावरणात दाब जाणवणे आणि आरंभीचे महागणपति पूजन झाल्‍यावर आनंद जाणवणे

विधींचे पुरोहित श्री. ईशान जाशी

श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीच्‍या प्रतिष्‍ठापना सोहळ्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी मला वातावरणात थोडा दाब जाणवत होता; मात्र या सोहळ्‍यातील आरंभीचे महागणपति पूजन झाल्‍यावर वातावरणातील दाब उणावला आणि मला आनंद जाणवू लागला.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी संपूर्ण विधी भावपूर्ण केल्‍यामुळे ‘श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीमध्‍ये प्राणप्रतिष्‍ठापनेच्‍या आधीच प्राण आला आहे’, असे जाणवणे

प्रतिष्‍ठापना विधीच्‍या अंतर्गत मूर्तीचा जलाधिवास (मूर्ती ठराविक कालावधीसाठी पाण्‍यात ठेवणे) आणि नंतर निद्राधिवास (मूर्तीला झोपवून तिच्‍यावर वस्‍त्राने आच्‍छादन करणे) विधी करण्‍यात आला. तेव्‍हा वातावरणात आनंद जाणवत होता. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ आणि सद़्‍गुरु गाडगीळकाका यांनी संपूर्ण विधी भावपूर्ण केल्‍यामुळे ‘श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीमध्‍ये प्राणप्रतिष्‍ठापना करण्‍यापूर्वीच प्राण आला आहे आणि या विधींमुळे मूर्ती अधिकच जागृत झाली आहे’, असे मला जाणवले.

३. निद्राधिवासाच्‍या वेळी श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीवर पांघरूण घातल्‍यावर ‘तिथे प्रत्‍यक्ष श्री सिद्धिविनायक झोपला असून श्‍वास घेतांना त्‍याचे पोट हलत आहे’, असे मला जाणवले.

४. निद्राधिवास विधीनंतर मूर्तीवरील पांघरूण काढल्‍यावर ‘भगवंताने डोळे उघडले असून त्‍याच्‍या डोळ्‍यांमधून पुष्‍कळ शक्‍ती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे

निद्राधिवास विधी झाल्‍यावर दुसर्‍या दिवशी श्री सिद्धिविनायकाला निद्रेतून उठवायचे होते. तेव्‍हा ‘प्रत्‍यक्ष भगवंताला निद्रेतून उठवण्‍याची सेवा मिळाली आहे’, या विचाराने मला पुष्‍कळ आनंद झाला. मी मूर्तीवरील पांघरूण काढल्‍यावर ‘भगवंताने डोळे उघडले आणि त्‍याच्‍या डोळ्‍यांमधून पुष्‍कळ शक्‍ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

५. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले यांनी श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीवर अक्षता वाहिल्‍यावर ‘मूर्तीतून शक्‍तीच्‍या लहरी अधिक प्रमाणात बाहेर पडत आहेत’, असे जाणवणे

श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीची प्रतिष्‍ठापना होणार होती. परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले यांच्‍या पावन हस्‍ते श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीवर अक्षता वाहिल्‍यावर श्री सिद्धिविनायकाच्‍या मूर्तीतून ‘शक्‍तीच्‍या लहरी अधिक प्रमाणात बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवले. तेव्‍हा मला माझ्‍या डोक्‍याच्‍या डाव्‍या बाजूला पुष्‍कळ प्रमाणात संवेदना जाणवल्‍या.

६. श्री. वझेगुरुजी भावपूर्ण मंत्र म्‍हणत असल्‍याने भावजागृती होणे आणि त्‍यानंतर ध्‍यान लागणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ आणि सद़्‍गुरु गाडगीळकाका यांनी मूर्तीवर तत्त्वे (विविध तत्त्वांचे देवतेमध्‍ये प्रक्षेपण करण्‍यासाठीचे मंत्र म्‍हणत देवतेच्‍या मूर्तीवर दर्भाने न्‍यास करणे) चढवली. श्री. दामोदर वझेगुरुजी (आताची आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के) भावपूर्ण मंत्र म्‍हणत होते. ते ऐकतांंना माझी भावजागृती होत होती. मी आणि श्री. चैतन्‍य दीक्षित श्री. वझेगुरुजींच्‍या समवेत तत्त्व चढवण्‍याचे मंत्र म्‍हणत होतो. तेव्‍हा माझे ध्‍यान लागत होते.

७. प्रत्‍यक्ष प्राणप्रतिष्‍ठापनेचा क्षण अनुभवतांना आलेली विलक्षण अनुभूती

श्री सिद्धिविनायक प्रतिष्‍ठापनेचा मुख्‍य क्षण आला. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी मूर्तीच्‍या हृदयाशी त्‍यांचा अंगठा ठेवला. तेव्‍हा श्री. वझेगुरुजींनी दीर्घ ‘ॐ कार’ म्‍हणून मूर्तीमध्‍ये प्राण आणले. त्‍या क्षणी मला ‘साक्षात् श्री पार्वतीदेवीने गणपतीला बोलावले आहे’, असे जाणवून माझी भावजागृती झाली. तेव्‍हा मला ‘सर्वप्रथम श्री सिद्धिविनायकाचे कान हलतांना दिसले. नंतर शस्‍त्रांसह हात हलतांना दिसले. त्‍यानंतर मूर्तीमध्‍ये प्राण स्‍थित झाला आणि त्‍याने पहिला दीर्घ श्‍वास घेतला’, असे जाणवले. अशा प्रकारे संपूर्ण मूर्ती सजीव झाल्‍याचे लक्षात आले. तो  विलक्षण क्षण होता. प.पू. गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉक्‍टर आठवले यांच्‍या) कृपेने मला प्रथमच अशी अनुभूती आली. ही अनुभूती शब्‍दात मांडणे कठीण आहे.

८. श्री सिद्धिविनायकाची पूजा करण्‍याची संधी मिळाल्‍याबद्दल कृतज्ञताभाव जागृत होणे

मी श्री सिद्धिविनायकाला पंचामृताचे स्नान घालून महाअभिषेक करत होतो. तेव्‍हा ‘आपण इतके दिवस ज्‍या भगवंताची वाट बघत होतो, तो प्रत्‍यक्ष समोर स्‍थानापन्‍न झाला असून भगवंताने मला त्‍याची पूजा करण्‍याची अमूल्‍य संधीही दिली आहे’, या जाणिवेने माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

९. मूर्तीच्‍या प्रतिष्‍ठापनेच्‍या सेवेच्‍या कालावधीत तहान, भूक आणि झोप यांची जाणीव न रहाणे, केवळ सतत आनंद अन् समाधान अनुभवणे

श्री सिद्धिविनायकाच्‍या प्रतिष्‍ठापनेच्‍या दोन दिवसांत देवाच्‍या कृपेने माझ्‍याकडून २१ घंटे सेवा झाली. त्‍या दिवशी मी केवळ २ वेळा चहा घेतला होता; परंतु त्‍या दिवशी ईश्‍वराकडून प्रक्षेपित होत असलेले आणि सद़्‍गुरूंचे चैतन्‍य यांमुळे माझे मन आनंदी अन् प्रसन्‍न होते. मला तहान, भूक किंवा झोप यांची जाणीव नव्‍हती. मी केवळ आनंद आणि समाधान अनुभवत होतो.

१०. कृतज्ञता

यातून श्री सिद्धिविनायकाने परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ आणि सद़्‍गुरु गाडगीळकाका यांचे महत्त्व माझ्‍या लक्षात आणून दिले. त्‍यांच्‍यामुळेच मला हे अनुभवता आले. त्‍याबद्दल मी सर्वांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता आहे.’

– श्री. ईशान जोशी, पुरोहित-पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक