रामनाथी आश्रमातील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती जागृत असल्‍याचे अनुभवणे

सौ. सुजाता रेणके

१. रामनाथी आश्रमात गेल्‍यानंतर प्रथम श्री भवानीदेवीचे दर्शन घेणे : ‘एकदा मी रामनाथी आश्रमात गेले होते. आश्रमात गेल्‍यानंतर १० मिनिटांनी मी श्री गणेशाचे दर्शन न घेता आधी श्री भवानीमातेच्‍या दर्शनासाठी गेले. तिचे दर्शन घेतांना माझी पुष्‍कळ भावजागृती झाली.

२. आधी श्री गणेशाचे दर्शन न घेतल्‍यासाठी त्‍याची क्षमा मागणे, तेव्‍हा त्‍याने ‘तू आश्रमात आल्‍याआल्याच माझे दर्शन घेऊन नमस्‍कार केला आहेस’, असे सांगणे : श्री भवानीदेवीचे दर्शन घेतल्‍यानंतर मी श्री गणेशाच्‍या दर्शनाला गेले. त्‍याचे दर्शन घेतांना मी त्‍याला म्‍हणाले, ‘सर्व जण तुझे प्रथम दर्शन घेतात; पण मी आज श्री भवानीमातेचे दर्शन घेतल्‍यानंतर तुझे दर्शन घ्‍यायला आले आहे. हे गणेशा, मला क्षमा कर.’ तेव्‍हा श्री गणेश मला म्‍हणाला, ‘नाही, तू प्रथम माझेच दर्शन घेतलेस. तू वाहनातून उतरतांना प्रथम मलाच पाहिलेस आणि नमस्‍कारही केलास.’

३. ‘श्री गणेशाचे रामनाथी आश्रमात येणार्‍या-जाणार्‍या सर्वांकडे लक्ष आहे’, असे जाणवणे : मला ते आठवत नव्‍हते. श्री गणेशाने सांगितल्‍यानंतर माझ्‍या ते लक्षात आले. तेव्‍हा माझा भाव जागृत झाला आणि ‘ही केवळ मूर्ती नसून हा जागृत गणपति आहे’, असे मला जाणवले. या प्रसंगातून ‘श्री गणेशाचे आश्रमात ये-जा करणार्‍या सर्वांकडे लक्ष असते’, हेही माझ्‍या लक्षात आले आणि पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

‘हे गुरुदेवा (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), तुमच्‍या कृपेनेच आज ‘आश्रमातील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती बोलते’, हे माझ्‍या लक्षात आले. मला ही अनुभूती तुमच्‍या कृपेनेच अनुभवता आली, त्‍यासाठी मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२०)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक