न्यायासाठी ग्रामस्थांचे सरपंच आणि उपसरपंच यांना निवेदन
सावंतवाडी – तालुक्यातील धनगरवाडी, आरोस येथे जलजीवन योजनेच्या अंतर्गत नळपाणीपुरवठा करण्यास मान्यता मिळाली आहे. येथे २५ कुटुंबे रहात आहेत; मात्र या योजनेसाठी सर्वेक्षण करतांना करण्यात आलेल्या चुकीमुळे यातील ५ कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित रहाणार आहेत, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. याविषयी न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सरपंच यांच्याकडे केली आहे.
ही धनगरवाडी अतीदुर्गम भागात आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. नळपाणीपुरवठा योजनेसाठी सर्वेक्षण करतांना येथील २५ पैकी ५ कुटुंबांना वगळण्यात आले आहे. नळयोजनेचे काम आता पूर्ण होत आल्याने या ५ कुटुंबांना पाणी मिळणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी ‘या योजनेचे सर्वेक्षण पुन्हा करून ५ कुटुंबांना त्यात समाविष्ट करावे आणि पाणी उपलब्ध करून द्यावे’, अशी मागणी आरोसच्या उपसरंपच सरिता नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर ‘संबंधित विभागाने त्वरित फेरविचार करून बाधित कुटुंबांना न्याय द्यावा, अन्यथा अधिकार्यांना घेराव घालू’, अशी चेतावणी सरपंच शंकर नाईक यांनी दिली आहे.