सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ८२ वर्षे) यांच्‍यामधील ‘सहजता, अहंशून्‍यता आणि शरणागतभाव’ या गुणांचे घडलेले दर्शन !

‘२.१२.२०२२ या दिवशी सत्‍संगात पू. गुरुनाथ दाभोलकर आजोबांची वंदनीय उपस्‍थिती होती. त्‍या वेळी त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, त्‍यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्‍यांच्‍या सत्‍संगात आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

पू. गुरुनाथ दाभोलकर
कु. अपाला औंधकर

१. पू. दाभोलकर आजोबांनी ध्‍यानावस्‍थेतून सर्वांना चैतन्‍य देणे

सत्‍संगात भावप्रयोग सांगत असतांना पू. दाभोलकर आजोबांचे ध्‍यान लागले होते. ते डोळे मिटून शांत बसले होते. तेव्‍हा सत्‍संगात पुष्‍कळ थंडावा जाणवत होता, तसेच शांतीतत्त्वाची अनुभूती येत होती. त्‍यांच्‍या या स्‍थितीमुळे ‘आम्‍हा सर्वांवर सूक्ष्मातून आध्‍यात्मिक स्‍तरावर उपाय होऊन वातावरण चैतन्‍यदायी होत होते’, असे मला जाणवले.

२. पू. दाभोलकर आजोबांनी बालसाधकांचे कौतुक करणे

सत्‍संग झाल्‍यानंतर पू. आजोबा आम्‍हा सर्वांना म्‍हणाले, ‘‘माझा तुम्‍हा सर्वांना गोड गोड आशीर्वाद ! तुम्‍ही लहान वयात गुरुदेवांची सेवा करण्‍यासाठी इकडे आला आहात. तुम्‍ही या वयात साधना करण्‍यासाठी आला आहात. आम्‍ही आमचे अर्धे आयुष्‍य वाया घालवले’, असे वाटते.’’ त्‍या वेळी आम्‍हा सर्वांना शिकायला मिळाले की, ‘पू. आजोबांच्‍या माध्‍यमातून गुरुदेवांनीच जाणीव करून दिली आहे की, आम्‍हाला लहान वयात साधना समजली आहे, तर आम्‍ही किती प्रयत्न करायला हवेत ! ‘देवाची आमच्‍यावर खरंच केवढी अपार कृपा आहे !’, याची जाणीव आणि कृतज्ञताभाव सतत अंतरात जागृत असायला हवा.’

३. पू. दाभोलकर आजोबांची भावस्‍थिती

पू. आजोबा आमच्‍याशी संवाद साधत असतांना त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून पुष्‍कळ भावाश्रू येत होते. आम्‍हाला त्‍यांच्‍यातील बालकभाव आणि भगवंतप्राप्‍तीची अपार तळमळ जाणवत होती. ‘त्‍यांचे भावाश्रू, म्‍हणजे भक्‍तीरसाने भारित झालेल्‍या लहरीच आहेत’, असे मला जाणवले.

४. सहजता, अहंशून्‍यता आणि शरणागतभाव

पू. आजोबा आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘मी तुम्‍हाला चैतन्‍य द्यायला आलो नाही, तर मी या सत्‍संगातील चैतन्‍य ग्रहण करायला आलो आहे.’’ खरेतर पू. आजोबांमुळे आम्‍हाला प्रचंड चैतन्‍य अनुभवता आले. यातून त्‍यांच्‍यातील ‘सहजता, अहंशून्‍यता आणि शरणागतभाव’ या गुणांचे आम्‍हाला दर्शन घडले. पू. आजोबा आम्‍हाला हे सांगत असतांना त्‍यांचे नेत्र पाणावले होते.

५. पू. दाभोलकर आजोबांनी केलेले मार्गदर्शन

पू. आजोबांनी सांगितले, ‘‘तुम्‍ही स्‍वीकारण्‍याची वृत्ती वाढवायला हवी. तुम्‍ही परिस्‍थिती  स्‍वीकारून देवाकडे १ पाऊल टाकले, तर देव १० पावले तुमच्‍या समवेत येईल. आपल्‍याला सर्वकाही स्‍वीकारायचे आहे.’’

‘प.पू. गुरुदेवा, तुम्‍हीच आम्‍हाला पू. दाभोलकर आजोबांचा सहवास अनुभवायला दिला आणि त्‍यांच्‍या माध्‍यमातून भरभरून चैतन्‍य दिले. त्‍यांनी केलेले मार्गदर्शन आम्‍हाला कृतीत आणता येऊ दे’, अशी आपल्‍या चरणकमली समर्पणभावाने प्रार्थना करते.’

– परात्‍पर गुरुदेवांची,

कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (१२.१२.२०२२)