वर्ष २०२२च्या विधानसभा निवडणुकीवर ६९ कोटी ९० लाख रुपये खर्च

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – गोवा सरकारने वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवर ६९ कोटी ९० लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आप’चे आमदार वेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘निवडणुकीत सर्वाधिक खर्च २२ कोटी ४० लाख रुपये वाहनांच्या भाडेपट्टीवर खर्च झाला आहे. वाहने भाड्यावर घेण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘ई-निविदा’ काढण्यात आली होती. सरकारने प्रिंटींग आणि स्टेशनरी यांवर ९ कोटी रुपये, अन्न आणि पेय यांच्यावर ३ कोटी ५० लाख रुपये, हॉटेलमधील निवास व्यवस्थेसाठी २ कोटी ३० लाख रुपये आणि मंडप उभारणीवर १ कोटी ४० लाख रुपये खर्च केले आहेत. यासह विज्ञापन देणे, इंधन खर्च, ‘स्ट्राँग रूम’मध्ये (विशेष खोलीमध्ये) ‘सीसीटीव्ही’ बसवणे, ध्वनीचित्रीकरण करणे, महिला मतदान आणि मतमोजणी केंद्रे उभारणे, प्रशिक्षण देण्यासाठी सभागृह आरक्षण आदींवर सुमारे ३१ कोटी २ लाख रुपये खर्च केले आहेत.’’