देहलीच्या विधानसभेत ‘आप’च्या आमदाराने दाखवले नोटांचे बंडल !

  • पैसे घेऊन नोकरी दिली जात असल्याचा आरोप !

  • गप्प रहाण्यासाठी लाच देण्यात आल्याचा दावा !

आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल

नवी देहली – देहलीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी विधानसभेत नोटांचे बंडल दाखवले. ते म्हणाले की, त्यांना लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याविषयी त्यांनी उपराज्यपालांकडे सूत्र उपस्थित केले आहे.

१. गोयल हे पिशवीत १५ लाख रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन विधानसभेत आले होते. विधानसभेतील भाषणाच्या वेळी पिशवीतून नोटा काढून ते म्हणाले, ‘‘हा ‘टोकन मनी’ (एखाद्या कामासाठी प्रारंभी देण्यात आलेली रक्कम) आहे, जो मला लाच म्हणून देण्यात आला होता. मी मुख्य सचिव आणि उपराज्यपाल यांना पैशांच्या बदल्यात नोकरी देण्याविषयीचे सूत्रदेखील उपस्थित केले होते. मी धोका पत्करून हे काम करत आहे. हे लोक इतके वाईट आहेत की, माझ्यासमवेत काही अनुचित घडू शकते. आवाज उठवू नये; म्हणून मला पैशांच्या स्वरूपात लाच देण्यात आली.’’

२. आमदार गोयल यांनी देहलीतील आंबेडकर रुग्णालयातील नोकरभरतीचे सूत्र विधानसभेत उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, येथे नियमानुसार ज्या लोकांना नोकर्‍या द्यायला हव्या होत्या, त्यांना दिल्या जात नाहीत. येथे नर्सिंग आणि इतर पदांसाठी निविदा काढण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार ८० टक्के भरती जुन्या कर्मचार्‍यांची असायला हवी; पण असे होत नाही. नोकरी मिळवून देणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनातून कंत्राटदार स्वत:चा वाटा उचलतात. माफिया आणि कंत्राटदार तडजोडीच्या माध्यमातून पैसे घेऊन नोकर्‍या देत आहेत. त्यांच्या तक्रारी सर्वत्र केल्या जात आहेत; पण कारवाई होत नाही.

संपादकीय भूमिका

या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !