आजपासून गोव्यात विनामूल्य कोविशिल्ड लसीकरण मोहीम

पणजी, १७ जानेवारी (सप) – आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार १८ जानेवारी २०२३ पासून काणकोण, सांखळी, पेडणे, केपे, फोंडा, चिंबल, मडगाव, वास्को, पणजी आणि म्हापसा येथील सरकारी रुग्णालये अन् बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय या आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत निवडलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये कोविशिल्ड लसीकरण मोहीम विनामूल्य चालू होईल.

कोरोना संसर्गाची अलीकडील जागतिक वाढ लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात येत आहे. कोरोनाविरोधी लसीची पहिली मात्रा (डोस), दुसरी मात्रा आणि दक्षता मात्रा १८ आणि त्याहून अधिक वर्षे वयोगटासाठी असेल. दक्षता मात्रेचे प्राधान्यक्रम आणि अनुक्रम आधीच्या मात्रांना ६ मास पूर्ण झाल्याच्या आधारे असेल; म्हणजे १७ जुलै २०२२ या दिवशी किंवा त्यापूर्वी कोरोनाविरोधी लसीची दुसरी मात्रा (दुसरा डोस) प्राप्त झालेल्या सर्वांना अन् आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ३ मास पूर्ण झालेल्यांना दक्षता मात्रा दिली जाईल. ज्यांनी कोविशिल्डच्या २ मात्रा (डोस) घेतल्या आहेत, त्यांना कोविशिल्डची मात्रा दक्षता मात्रा म्हणून दिली जाईल. लसीकरण ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा साठा संपेपर्यंत प्रत्येक बुधवारी (सकाळी ९ ते दुपारी ४) आणि शनिवारी (सकाळी ९ ते दुपारी १२) केले जाईल.

लसीकरणाच्या ठिकाणी लाभार्थ्यांची नोंदणी त्याच वेळी केली जाईल. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की, त्यांनी नोंदणीसाठी येतांना मागील लसीकरणासाठी वापरलेला पुरावा; म्हणजे अंतिम लसीकरण प्रमाणपत्र किंवा कोरोनाविरोधी लसीकरण कार्ड, दूरध्वनी क्रमांक आणि ओळखपत्र समवेत ठेवावे.