‘हिंदु विवाह कायद्या’नुसार आंतरधर्मीय विवाह अवैध ! – सर्वोच्च न्यायालय

कायद्यानुसार विवाहासाठी दोघांनी हिंदु असणे आवश्यक !

नवी देहली – आंतरधर्मीय दांपत्यांचा विवाह ‘हिंदु विवाह कायद्या’नुसार रहित  ठरतो. या कायद्यानुसार केवळ हिंदूच लग्न करू शकतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. वर्ष २०१७ मध्ये तेलंगाणातील एका हिंदु महिलेने तिच्या पतीविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ४९४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या कलमानुसार पहिला पती असतांना दुसरे लग्न केल्यास ७ वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात महिला हिंदु असून आरोपी पती भारतीय-अमेरिकी ख्रिस्ती आहे. पोलिसांनी आरोपपत्र प्रविष्ट केल्यानंतर त्या व्यक्तीने खटला रहित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; मात्र ती फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर फेब्रुवारीमध्ये अंतिम सुनावणी करणार आहे.