केवळ २१ अब्जाधीश लोकांकडे ७० कोटी भारतियांपेक्षा अधिक संपत्ती ! – ‘ऑक्सफॅम’ संस्थेचा अहवाल

नवी देहली – ‘ऑक्सफॅम’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार भारतामधील २१ अब्जाधीश लोकांकडे देशातील ७० कोटी भारतियांपेक्षा अधिक संपत्ती आहे. ‘सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट : द इंडिया स्टोरी’ या नावाने ‘ऑक्सफॅम’चा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार भारतात वर्ष २०२० मध्ये अब्जाधिशांची संख्या १०२ एवढी होती, ती वाढून २०२२ मध्ये १६६ एवढी झाली आहे. हा अहवाल आता स्वित्झर्लंड येथील दावोस शहरामध्ये होणार्‍या जागतिक आर्थिक परिषदेत मांडला जाणार आहे.

१. या अहवालानुसार, वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारी चालू झाल्यानंतर नोव्हेंबर २०२१ पर्यंत अनेक भारतियांना रोजगारासंबंधी समस्या निर्माण झाल्या. काहींच्या नोकर्‍या गेल्या. अनेकांना त्यांची बचत संपवावी लागली; मात्र दुसर्‍या बाजूला भांडवलदारांच्या संपत्तीमध्ये  तब्बल १२१ टक्के एवढी वाढ झाली. भांडवलदाराच्या संपत्तीमध्ये दिवसाला ३ सहस्र ६०८ कोटी रुपयांची वाढ होत होती.

२. अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०२१ मध्ये भारताच्या केवळ ५ टक्के लोकांकडे देशातील एकूण ६२ टक्के लोकांची संपत्ती एकवटलेली होती, तर दुसरीकडे भारताच्या ५० टक्के लोकसंख्येकडे देशातील केवळ ३ टक्के संपत्तीचा भाग होता.