भारतीय सैन्य भविष्यातील युद्धासाठी सिद्ध ! – सैन्यदलप्रमुख मनोज पांडे

सैन्यदलप्रमुख मनोज पांडे

बेंगळुरू (कर्नाटक) – चीनसमवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील कोणत्याही कृत्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही पूर्णपणे सिद्ध आहोत. गेल्या वर्षभरात सैन्याने सुरक्षेच्या आव्हानांचा खंबीरपणे सामना केला आहे. सैन्याने स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी, तसेच सैन्याची पुनर्रचना आणि प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. भविष्यातील युद्धासाठी आम्ही सिद्ध आहोत, असे प्रतिपादन भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी येथे आयोजित ७५ व्या सैन्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

१. सैन्यदलप्रमुख पांडे म्हणाले की, उत्तर सीमेवरील भागातील परिस्थिती सामान्य आहे. यंत्रणांद्वारे शांतता राखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर भक्कम स्थान राखतांना आम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सिद्ध आहोत. तसेच कठीण प्रदेश आणि वाईट हवामान असूनही आमचे शूर सैनिक तेथे तैनात आहेत. त्यांना सर्व प्रकारची शस्त्रे आणि उपकरणे पुरेशा प्रमाणात पुरवली जात आहे. स्थानिक प्रशासन, इतर यंत्रणा आणि सैन्य यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासात सुधारणा झाली आहे.

२. पाकला लागून असलेल्या सीमेविषयी जनरल पांडे म्हणाले की, या सीमेवरील भागात युद्धविराम आहे; परंतु सीमेपलीकडील आतंकवाद्यांच्या निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधा अजूनही कायम आहेत.