जगभरात जपानचे पारपत्र पहिल्या क्रमांकावर, तर भारताचे ८५ व्या क्रमांकावर !

नवी देहली – ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’नुसार ठरवण्यात आलेल्या क्रमवारीमध्ये सर्वाधिक प्रबळ पारपत्रामध्ये जपानचे नाव अव्वल आहे. जपानचे पारपत्र असलेल्या व्यक्तीला १९३ देशांत विनाव्हिसा प्रवेश मिळतो. या सूचीमध्ये पहिला क्रमांक मिळवण्याचे जपानचे हे ५ वे वर्ष आहे. या क्रमवारीमध्ये सिंगापूर आणि दक्षिण कोरिया यांना दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. त्यानंतर जर्मनी, स्पेन, फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग यांचे नाव आहे. सर्वांत शेवटी अफगाणिस्तानचे नाव आहे. अमेरिका २२ व्या क्रमांकावर आहे.

पारपत्रधारक हे व्हिसा न घेता प्रवेश करू शकणार्‍या देशांच्या संख्येनुसार ही क्रमवारी ठरवली जाते. ‘इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन’कडून मिळालेल्या माहितीवरून ‘हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ही क्रमवारी ठरवते. या १०९ देशांच्या सूचीमध्ये भारताचा क्रमांक ८५ वा आहे. भारताचे पारपत्र असणारी व्यक्ती ५९ देशांमध्ये विनाव्हिसा प्रवेश करू शकते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी भारताचा ८७ वा क्रमांक होता. या क्रमवारीमध्ये नेपाळ १०३ वर, तर पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर आहे.